Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडराजकारण

Mission PCMC : महामंडळावर संधी कुणाला?…माजी आमदार विलास लांडे की माजी महापौर योगेश बहल?

माजी नगरसेवक अजित गव्हाणे यांच्या मागणीनंतर राष्ट्रवादीतील निष्ठावंत गट ‘ॲक्टिव्ह’ : चिंचवडमधून माजी विरोधी पक्षनेते नाना काटे समर्थकांच्याही आशा आता पल्लवीत

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे नेते, पदाधिकाऱ्यांना ताकद देण्याच्या दृष्टीने भाजपा- शिवसेना- राष्ट्रवादी महायुती सरकारच्या माध्यमातून विविध महामंडळांचे वाटप लवकरच करण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरात माजी आमदार विलास लांडे यांना श्रीक्षेत्र पंढरपूर येथे देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी नियुक्ती करावी, अशी मागणी होत असतानाच आता माजी महापौर योगेश बहल यांनाही महत्त्वाच्या पदावर संधी मिळावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निष्ठावंत गटाने ‘फिल्डिंग’ लावली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. आगामी 4 महिन्यांत निवडणुका पूर्ण होतील. या निवडणुकीची रणनिती ठरवण्यासाठी मुंबईत बुधवारी समन्वय समितीची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीमध्ये महामंडळांच्या नियुक्ती, विश्वस्त संस्थांच्या नियुक्ती निश्चित करण्याबाबत एकमत झाले आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी असे चित्र निर्माण झाले आहे. गेल्या आठवड्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये माजी नगरसेवक अजित गव्हाणे आणि सहकाऱ्यांचा पक्षप्रवेश भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहामध्ये झाला. त्यावेळी गव्हाणे यांनी ‘‘विलास काकांना पंढरपूर देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी संधी द्यावी..’’ असे साकडे व्यासपीठ बसलेल्या अजितदादांना जाहीरपणे घातले.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार यांच्यासोबत एकनिष्ठ राहिलेल्या आमदार आण्णा बनसोडे यांना पक्षाने विधानसभा उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. बनसोडे पिंपरी विधानसभा मतदार संघातून प्रतिनिधीत्व करतात. या मतदार संघातील प्रभागातून सलग सातवेळा महापालिकेत निवडून आलेल्या माजी महापौर योगेश बहल यांना विधान परिषदेवर संधी मिळावी, अशी अपेक्षा होती. मात्र, स्थानिक राजकारणामुळे बहल यांना संधी मिळाली नाही.

माजी आमदार विलास लांडे यांनी राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवार आणि अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात काम केले. राष्ट्रवादीत फूट पडली. त्यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. विधानसभा निवडणुकीत लांडे यांनी अजित गव्हाणे यांचा प्रचार करुन महाविकास आघाडीचे व्यासपीठ गाजवले. विधानसभा निवडणुकीच्या राजकारणात त्यांनी 2004 मध्ये राष्ट्रवादी, 2009 मध्ये अपक्ष आणि 2014 मध्ये पुन्हा राष्ट्रवादी, तर 2019 मध्ये अपक्ष निवडणूक लढवली होती. तसेच, 2014 आणि 2019 मध्ये त्यांनी शिरुर लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारीही केली होती. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादीचे तिकीट देण्यात आले. त्यावेळी लांडे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. राजकीय परिस्थितीनुसार वेळोवेळी भूमिका बदलणारे विलास लांडे यांना महामंडळावर संधी देण्याबाबत राष्ट्रवादीतून अंतर्गत विरोध होतो आहे.

…. म्हणून योगेश बहलांनी संधी मिळाली पाहिजे! (विलास लांडे)

विधानसभा निवडणुकीत तत्कालीन शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. 25 ते 30 नगरसेवक सोबत घेवून शरद पवार गटात प्रवेश केला. पक्षाला मोठे खिंडार पडले असतानाही योगेश बहल यांनी शहराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आणि पक्षाचे अस्थित्व टिकवून ठेवले. 2014 मध्ये तत्कालीन आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासह अनेकांनी भाजपात प्रवेश केला. माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनीही लोकसभा निवडणुकीत पक्षाला रामराम ठोकला. शहरात प्रचंड राजकीय उलथापालथ होत असताना माजी महापौर योगेश बहल यांनी अजित पवार यांची साथ सोडली नाही. त्यामुळे बहल यांना खऱ्या अर्थाने महामंडळ अथवा देवस्थानच्या अध्यक्षपदी संधी मिळायला हवी, अशी मागणी होत आहे. विशेष म्हणजे, महापालिकेतील कामकाजाचा प्रचंड अभ्यास, उच्चशिक्षीत आणि प्रोफेशनल चेहरा असलेले योगेश बहल आगामी महापालिका निवडणुकीत चांगली कामगिरी करतील. तसेच, स्थानिक आणि शहराबाहेरील लोकांची मोट बांधण्याची क्षमता असल्यामुळे बहल यांना अजित पवार संधी देतील, असा दावा काही लोकांकडून केला जात आहे.

माजी विरोधी पक्षनेते नाना काटे समर्थकांच्या आशा पल्लवीत..!

चिंचवड विधानसभा मतदार संघातून भाजपा आणि शिवसेनेची खुली ऑफर असतानाही माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी पक्षासोबत राहण्याचा निर्णय घेतला. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवली. मात्र, महाविकास आघाडीत फूट पडल्यामुळे त्यांना पराभव पत्कारावा लागला. 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपामध्ये चिंचवड भाजपाला गेला. त्यावेळी महाविकास आघाडीकडून नाना काटे यांना ऑफर होती. मात्र, अजित पवार यांच्या सूचनेला मान देवून काटे यांनी आमदार शंकर जगताप यांचा सक्रीयपणे प्रचार केला आणि जगताप विजयी झाली. अजित पवार म्हणजे पक्ष आणि त्यांचा आदेश शिरसावंध्य मानून काम करणारा कार्यकर्ता म्हणून नाना काटे यांना विधान परिषदेवर संधी मिळावी, अशी मागणी होती. ‘‘आता विधान परिषद नाही, तर किमान महामंडळावर तरी दादांनी संधी देतील’’ अशी अपेक्षा नाना काटे समर्थकांना आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button