“महाराष्ट्रासारखी मॅच फिक्सिंग आता बिहारमध्ये…”; राहुल गांधींनी 5 टप्प्यांद्वारे केला भाजपवर हल्लाबोल

Rahul Gandhi : लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. एका वृत्तपत्रातील लेखात मॅच फिक्सिंगसारखा घोटाळा केल्याचा आरोप राहुल गांधींनी भाजपवर केला आहे. राहुल गांधी यांनी लेखामध्ये पाच 5 या टप्प्यांमध्ये हा सर्व आराखडा मांडत भाजपवर हल्लाबोल केला आहे. इतकेच काय तर राहुल गांधी यांनी आकडेवारीसह निवडणुकीचे संपूर्ण गणित सांगितले आहे.
राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात मतदानानंतर अचानक 7.83 टक्के मतदान टक्केवारी वाढणे ही इतिहासातील अभूतपूर्व घटना असल्याचे म्हटले आहे. पहिला टप्पा निवडणूक आयोगाच्या नियुक्तीसाठी पॅनेलमध्ये घोटाळा करणं, दुसरा टप्पा बनावट मतदारांचा मतदारयादीत समावेश करणं, तिसरा टप्पा मतदानाची टक्केवारी वाढवणं, चौथा टप्पा बनावट मतदान अशा ठिकाणी करून घेणं जिथं भाजपला जिंकवायचंय आणि पाचवा टप्पा पुरावे लपवणं या टप्प्यांमधूंन त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. याशिवाय डुप्लिकेट मतदार असल्याचा गंभीर आरोप राहुल यांनी केला आहे.
राहुल गांधी यांनी म्हटलं की, भाजप महाराष्ट्रात इतकी हतबल का होती हे पाहणं कठीण नाही पण हा घोटाळा मॅच फिक्सिंगसारखा आहे. जो पक्ष धोका देतो तो खेळ जिंकूही शकतो पण संस्थांना फटका बसतो. त्यासोबतच जनतेचा विश्वास नाहीसा करतो. भारतीयांनी पुरावे पाहिले पाहिजेत. त्यांनीच आता यावर निर्णय घ्यावा आणि उत्तर मागावं. कारण महाराष्ट्राची मॅच फिक्सिंग आता पुढच्यावेळी बिहारमध्ये होईल जिथं भाजपचा पराभव होत असेल. निवडणूक आयोगाने विरोधकांच्या सर्व मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
हेही वाचा – GST स्लॅब 4 वरून 3 वर, 12% करसवलतीनंतर काय स्वस्त, काय महाग?
भाजप नेते आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी यांच्या लेखावर टीका करत स्वत:चं अपयश लपवण्यासाठी दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा असं बावनकुळे यांनी म्हटले. याशिवाय २००९ मध्ये पाच महिन्यात ३० लाख मतदार वाढले तेव्हा तुम्ही घोटाळा केला होता का? २००९ ला निवडणूक आयोगावर विश्वास होता की तेव्हाही काँग्रेस-आयोग युतीच होती? असे प्रश्नही बावनकुळेंनी राहुल गांधींना विचारले आहेत.
राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांबाबत यापूर्वी अनेकदा प्रश्न उपस्थित केले आहेत. एप्रिल महिन्यात त्यांनी अमेरिकेतील बोस्टन येथे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यावेळी त्यांनी म्हटले होते की, हे पूर्णपणे स्पष्ट आहे की भारतीय निवडणूक आयोगाने तडजोड केली आहे. या यंत्रणेत काहीतरी गडबड आहे. काँग्रेसने ऑक्टोबर 2024 मध्ये हरियाणा निवडणुकीच्या निकालांवरही प्रश्न उपस्थित केले होते.