ताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मराठी कुटुंबाला मारहाण,ठाकरे गटाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका

सरकार तुमचे असेल, पण हे राज्य ‘मराठी’ ,आहे हे लक्षात ठेवा अशा शब्दात घणाघात

कल्याण : कल्याणमध्ये एका मराठी कुटुंबावर अमराठी माणसाने अमानुष हल्ला केला. धूप-अगरबत्ती लावण्यावरुन हा किरकोळ वाद सुरु झाला. त्यानंतर या वादाचे रुपांतर मारहाणीत झाले. एका परप्रांतीय कुटुंबाने बाहेरुन गुंड आणून कारण नसताना लोखंडी रॉडने मराठी कुटुंबाला मारहाण केली. या हल्ल्यामुळे एका तरुणाच्या डोक्यात तब्बल 10 टाके पडले. कल्याण पश्चिमेला असलेल्या योगीधाम परिसरातील अजमेरा हाईट्स या उच्चभ्रू सोसायटीत बुधवारी रात्री हा सर्व धक्कादायक प्रकार घडला. याचे काही व्हिडीओही समोर आले आहेत. आता यावरुन शिवसेना ठाकरे गटाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून एकनाथ शिंदेंवर टीका करण्यात आली आहे. मराठी माणूस तुडवला जातोय! शिंध्यांनो, पेढे वाटा! या आशयाखाली सामना अग्रलेख पाहायला मिळत आहे. कल्याणचा हा शुक्ला कोण? त्याचा बाप कोण? कोणाच्या जिवावर तो मराठी माणसांना धमक्या देत आहे? मुख्यमंत्री कार्यालयातील त्याचा दलाल कोण? श्रीमान फडणवीस, मिंधे याचा खुलासा करा. करावाच लागेल. सरकार तुमचे असेल, पण हे राज्य ‘मराठी’ आहे हे लक्षात ठेवा, अशा शब्दात राज्य सरकारवर घणाघात करण्यात आला.

आज मुंबई, ठाण्यात, पुण्यात, नाशिकात मराठी माणसांवर हल्ले सुरू आहेत. उद्या हे लोण नागपूर, अमरावती, जळगावपर्यंत पोहोचेल व महाराष्ट्र कमजोर करून मोदी–शहा–फडणवीसांचा दास बनून पायाशी पडेल. शिवसेना तोडून सत्तेसाठी सरकारसोबत गेलेले मिंधे पेढे वाटण्यासाठी त्याच क्षणाची वाट पाहत आहेत. कल्याणचा हा शुक्ला कोण? त्याचा बाप कोण? कोणाच्या जिवावर तो मराठी माणसांना धमक्या देत आहे? मुख्यमंत्री कार्यालयातील त्याचा दलाल कोण? श्रीमान फडणवीस, मिंधे याचा खुलासा करा. करावाच लागेल. सरकार तुमचे असेल, पण हे राज्य ‘मऱ्हाटी’ आहे हे लक्षात ठेवा. शुक्ला मंत्रालयातला तुमचा नोकर असेल तर त्याच्यावर महाराष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून बडतर्फ करा, की त्यासाठी उत्तर प्रदेश सरकारची परवानगी घ्यावी लागेल? मिंध्यांनो, पेढे वाटा, पेढे वाटा, महाराष्ट्र खरेच कमजोर झालाय!, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात भाजप व त्यांच्या मित्रपक्षांना पाशवी बहुमत मिळाले. त्या पाशवी बहुमतातून आलेले सरकार हे नपुंसक आहे. बहुमत आहे, पण ते बहुमत खरे नाही. तसे नसते तर मुंबई, ठाणे, कल्याण, अंबरनाथ परिसरात मराठी माणसांवर निर्घृण हल्ले झाले नसते. मराठीद्वेष्टय़ांना वाटते, महाराष्ट्रात आता आपले सरकार आले आहे. त्यामुळे मराठी माणसाला लाथाडले, तुडवले तरी आपले कोण काय वाकडे करणार? या मस्तीत ते आहेत. कल्याणच्या उच्चभ्रू वस्तीत कोणी अखिलेश शुक्ला नामक उपऱ्याने गुंड टोळ्यांच्या मदतीने मराठी कुटुंबावर हल्ला केला. मराठी माणसे मच्छी-मटण खातात, ती घाणेरडी आहेत या सबबीखाली शुक्ला व त्याचे गुंड कल्याण परिसरात झुंडशाही करतात आणि फडणवीसांचे पोलीस त्या शुक्लासमोर नांगी टाकतात, असा आरोपही अग्रलेखातून करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button