आवाज कुणाचा? माटे शाळेचा! ‘सकाळ NIE’ आंतरशालेय नाट्य स्पर्धेत ‘निर्धार’ची बाजी
निगडी-प्राधिकरणात दिमाखदार पारितोषिक वितरण सोहळा संपन्न; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
“अरे आवाज कुणाचा…?” निकालाची प्रचंड उत्कंठा, विजयाचा जल्लोष आणि टाळ्यांचा कडकडाट… अशा अत्यंत उत्साही वातावरणात ‘सकाळ एनआयई’ (NIE) आयोजित आंतरशालेय नाट्य स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा निगडी-प्राधिकरण येथे पार पडला. या स्पर्धेत पिंपरी-चिंचवड विभागातून चिंचवड येथील व्ही. के. माटे हायस्कूलच्या ‘निर्धार’ या नाटिकेने प्रथम क्रमांक पटकावत आपले वर्चस्व सिद्ध केले.
विद्यार्थ्यांच्या अंगभूत अभिनय कौशल्याला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील अनेक शाळांनी यात सहभाग नोंदवून सामाजिक प्रश्न आणि जनजागृतीवर आधारित प्रभावी नाटिका सादर केल्या.
दिग्गजांच्या हस्ते सन्मान..
मातृमंदिर विश्वस्त संस्थेचे कार्यवाह मनोज देवळेकर, उपकार्यवाह सुधीर कुलकर्णी, कोषाध्यक्ष शिवराज पिंपुडे आणि ‘सकाळ’चे सहयोगी संपादक जयंत जाधव यांच्या हस्ते विजेत्या संघांना स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांची मोठी उपस्थिती होती. ‘सकाळ एनआयई’चे वरिष्ठ व्यवस्थापक विशाल सराफ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
हेही वाचा : राज्यात ७० हजार पदांची लवकरच नोकरभरती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
स्पर्धेचा सविस्तर निकाल:
सांघिक निकाल (पिंपरी-चिंचवड विभाग):
प्रथम क्रमांक: व्ही. के. माटे हायस्कूल, चिंचवड (नाटिका: निर्धार)
द्वितीय क्रमांक: ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी (नाटिका: पहाट)
तृतीय क्रमांक: अमृता विद्यालयम्, निगडी (नाटिका: शह)
उत्तेजनार्थ: एच. ए. विद्यालय, पिंपरी (फिनिक्स) व फत्तेचंद जैन विद्यालय, चिंचवड (भावनांची पेटी)
वैयक्तिक व तांत्रिक यश:
उत्कृष्ट अभिनय: दुर्वांकुर इंगळे (एच. ए. विद्यालय), काव्या साताळकर (व्ही. के. माटे हायस्कूल)
उत्कृष्ट दिग्दर्शन: भार्गवी शिंदे, संकेत भोसले (व्ही. के. माटे हायस्कूल)
उत्कृष्ट नेपथ्य: व्ही. के. माटे हायस्कूल, चिंचवड
या यशामुळे व्ही. के. माटे हायस्कूलवर कौतुकाचा वर्षाव होत असून, बालकलाकारांच्या कलेला मिळालेल्या या दादामुळे शैक्षणिक वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे.
आमच्या विद्यार्थ्यांनी ‘निर्धार’ नाटिकेच्या माध्यमातून सामाजिक विषयाची जी मांडणी केली, त्याला मिळालेली ही पावती आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मुलांची मेहनत यामुळेच आम्ही प्रथम क्रमांकासह दिग्दर्शन आणि नेपथ्यातही यश मिळवू शकलो. ‘सकाळ एनआयई’ने उपलब्ध करून दिलेल्या या व्यासपीठामुळे विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास नक्कीच वाढला आहे.
– इंद्रायणी पिसोळकर (प्राचार्या, व्ही. के. माटे हायस्कूल, चिंचवड)



