मराठा आरक्षण समन्वय समितीच्या अध्यक्षांचा सरकाला ‘अल्टिमेटम’
![Maratha Reservation Coordination Committee Chairman Sarkala Ultimatum](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/Maratha-Reservation-Coordination-Committee-780x470.jpg)
पुणे : मराठा समाजाची सरकारकडून घोर निराशा झाली आहे. राज्य शासनाने मराठा समाजाच्या आरक्षणासह अन्य मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा १४ मे नंतर पुन्हा आंदोलन करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात १५ मे पासून पालकमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर गोंधळ घातला जाईल. तरीही दुर्लक्ष केले तर केंद्र आणि राज्यातील मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू दिले जाणार नाही. त्यांना काळे झेंडे दाखवले जातील. तरीही सरकार जागे झाले नाही तर १ जून पासून मुख्यमंत्री कार्यालयासमोर आरक्षण समितीच्या वतीने प्राणांतिक उपोषण करण्यात येईल असा अल्टिमेटम मराठा आरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष सुभाष दादा जावळे पाटील यांनी राज्य सरकारला दिला.
सुभाष जावळे म्हणाले की, संघर्षातून आणि त्यागातून मराठा समाजाला मिळालेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावले. आरक्षण न मिळाल्याने मराठा समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. आज एल्गार परिषद झाली. यात अनेक महत्वाचे निर्णय झाले आहेत. मराठी समाजाला ओबीसींच आरक्षण नको आम्हाला स्वतंत्र आरक्षण हवं आहे. राज्यसरकार ने यावर विचार करावा, वेळ पडल्यास घटना बदलावी. त्यांना कुठलीही अडचण येणरा नाही. केंद्रात आणि राज्यात त्यांचे सरकार आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/image-6-1024x576.png)
संभाजी महाराज यांची जयंती होताच जिल्ह्या-जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या घरासमोर जागरण गोंधळ घालणार आहोत. तरीही सरकारला सद्बुद्धी नाही मिळाली तर मात्र कुठल्याही मंत्र्यांना आम्ही रस्त्यावर, मतदारसंघात फिरू देणार नाहीत. त्यांना आम्ही काळे झेंडे दाखवणार. तसेच, १ जून ला आम्ही मुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर उपोषणाला बसणार आहोत असा इशारा त्यांनी दिला आहे, असं ते म्हणाले.