‘५ जानेवारीपर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावा’; शपथविधी होताच जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा

Manoj Jarange Patil | विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड मोठं बहुमत मिळाल्यानंतर ५ डिसेंबरला भाजापाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दरम्यान हा शपथविधी झाल्याच्या दुसर्याच दिवशी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला एक महिन्याचा अल्टिमेटम दिला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, की सरकार स्थापन झालं आहे, आता जनतेचे प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे. जी समाजातील खदखद त्यांना दिसत नसेल, पण ती इतकी भयंकर सुप्त लाट आहे की ते त्रासून जातील. काल ५ तारखेला त्यांचं सरकार स्थापन झालं आहे. त्यांना आम्ही शुभेच्छा दिल्या आहेत. तिघांचेही मनापासून अभिनंदन.
हेही वाचा – उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच अजित पवारांना मोठा दिलासा
पुढच्या काळात गोरगरीबांचे प्रश्न मार्गी काढावे. कारण ५ तारखेला त्यांचा शपथविधी झाला, आता येत्या ५ तारखेपर्यंत म्हणजेच ५ जानेवारीपर्यंत या एक महिन्यात त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय मार्गी काढावा, अन्यथा मराठे पुन्हा तुफान ताकदीने आंदोलनासठी उभे राहून सरकारला परेशान करणार, सोडणार नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
८३ क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक आहे, २००४ चा अध्यादेशात दुरूस्ती करावी, सगेसोयरेची अंमलबजावीणी करावी, हैदराबादसह सातारा संस्थान आणि बॉम्बे सरकारचे गॅझेट, या तीनही गॅझेट संबंधीच्या मागण्या, लाखो पोरांवरील दाखल झालेले गुन्हे मागे घेणे अशा आपल्या आठ ते नऊ मागण्या याच सरकारकडे केलेल्या आहेत त्या त्यांनी मार्गी काढाव्या, अन्यथा त्यांना पुन्हा मराठ्यांना सामोरे जावे लागेल, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.





