दारू पिण्यास पैसे न दिल्याने डोक्यात दगड घातला; खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाला अटक
गुलटेकडीतील डायस प्लॉट परिसरातील घटना; दुसऱ्या घटनेत पत्नीला नांदविण्यास न पाठवल्याने जावयाने सासऱ्यावर तीक्ष्ण शस्त्राने केला वार

पुणे : पुणे शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीच्या घटनांनी खळबळ उडाली आहे. स्वारगेट आणि चतु:शृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न केल्याच्या दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. पहिल्या घटनेत दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी करण्यात आले. तर दुसऱ्या घटनेत पत्नीला नांदविण्यास पाठवत नसल्याच्या कारणावरून जावयाने सासऱ्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याचे समोर आले आहे.
दारूसाठी पैसे न दिल्याने तरुणाच्या डोक्यात दगड
गुलटेकडीतील डायस प्लॉट परिसरात दारू पिण्यास पैसे न दिल्याने तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
हेही वाचा | जिल्हा स्कुल बस सुरक्षितता समितीची बैठक संपन्न
राजू शिवलिंगप्पा इककळकी (वय ३०, रा. डायस प्लॉट, गुलटेकडी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी प्रेम संजय काळे (वय २८, रा. डायस प्लॉट, गुलटेकडी) याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत राजू यांची आई लक्ष्मीबाई (वय ५८) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू इककळकी हे बुधवारी (१२ ऑगस्ट) सकाळी साडेसातच्या सुमारास गुलटेकडीतील डायस प्लॉट परिसरात थांबले होते. आरोपी प्रेम काळे हा राजू यांच्या ओळखीचा आहे. प्रेम याने राजू यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र, राजू यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपी चिडला.
त्यानंतर आरोपीने राजू यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्यानंतर आरोपीने त्यांना मारहाण केली. याचदरम्यान त्याने राजू यांच्या डोक्यात दगड घातला. दगडाने केलेल्या मारहाणीत राजू गंभीर जखमी झाले. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.
गंभीर जखमी झालेल्या राजू यांना तातडीने उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्वारगेट पोलिसांनी तपास सुरू करून पसार झालेल्या आरोपीचा शोध घेतला. पोलिसांनी प्रेम काळे याला अटक केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शेळके करत आहेत.





