महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी धक्कादायक चेहरा?
मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची जोरदार चर्चा; मराठा समीकरण लक्षात घेत भाजप श्रेष्ठींकडून चाचपणी सुरु
मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी धक्कादायक नाव येण्याची चर्चा काही काळापासून राजकीय वर्तुळात सुरु आहे. मराठा समीकरण लक्षात घेत त्यासंदर्भातील चाचपणी भाजप श्रेष्ठींकडून सुरु असल्याचं बोललं जात आहे. भाजप सरचिटणीस विनोद तावडे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बैठकीत तशी खलबतं झाल्याचीही चर्चा आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या ऐतिहासिक यशाचे शिल्पकार म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. परंतु असे असतानाच अचानक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे.
कोण आहेत मुरलीधर मोहोळ?
कुस्तीचा आखाडा गाजवत असतानाच भाजपातून राजकारणात प्रवेश केलेले मुरलीधर मोहोळ हे पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. पहिल्याच प्रयत्नात खासदारकी पटकवणाऱ्या मोहोळ यांच्या खांद्यावर केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाचीही धुरा देण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्ष संघटनेत विविध जबाबदाऱ्या पार पाडत मुरलीधर मोहोळ यांनी चार वेळा पुणे महापालिकेचे नगरसेवकपद, स्थायी समितीचे अध्यक्षपद आणि महापौरपदही भूषवले आहे. मराठा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. अमित शाह यांचे ते विश्वासू मानले जातात.
दरम्यान, खुद्द मुरलीधर मोहोळ यांनी एक्स सोशल मीडियाच्या माध्यमातून या चर्चा निरर्थक असल्याचं सांगत पार्लिमेंट्री बोर्डाच्या निर्णयाकडे बोट दाखवलं आहे.
मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?
समाजमाध्यमांमधून माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी होणारी चर्चा निर्थरक आणि कपोलकल्पित आहे. आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढताना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात लढलो. महाराष्ट्राच्या जनतेने कौलही ऐतिहासिक दिला आहे, असे मोहोळ म्हणतात.
आमच्या भारतीय जनता पार्टीत पक्षशिस्त आणि पार्टीचा निर्णय सर्वोच्च असतो. असे निर्णय पार्लिमेंटरी बोर्डात एकमतावर घेतले जातात, ना की सोशल मीडियाच्या चर्चेवर! आणि पार्लिमेंट्री बोर्डात एकदा का निर्णय झाला, तर पार्टीचा निर्णय आमच्यासाठी सर्वोच्च असतो. म्हणूनच माझ्या नावाची सोशल मीडियात होणारी चर्चा अर्थहीन आहे, असे स्पष्टीकरण मोहोळ यांनी दिले आहे.