आमदार जितेंद्र आव्हाड यांचा स्वीय्य सहाय्यक तडीपार, महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये 2 वर्षांसाठी प्रवेश बंदी
![Leader Jitendra Awad's personal assistant Tadipar, Maharashtra has been banned from entering these districts for 2 years](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/JITENDRA-AWHAD-1-780x470.png)
ठाणे ः महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड यांचे पीए अभिजीत पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ठाणे पोलिसांनी अभिजित पवार यांना ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, पालघर आणि रायगड जिल्ह्यात प्रवेश करण्यास दोन वर्षांसाठी बंदी घातली आहे.
अभिजीत पवार हा आरोपी असून आव्हाड यांच्या बंगल्यात अभियंता अनंत करमुसे यांना फेसबूकवर अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी आव्हाड यांच्या बंगल्यावर मारहाण केल्याप्रकरणी तो जामिनावर बाहेर आहे. आव्हाड यांनी मुलगी आणि जावयाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा एक ऑडिओ व्हायरल झाला होता. हा आवाज ठाणे महापालिकेचे वादग्रस्त सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांचा असल्याचा दावा आव्हाड यांनी केला होता आणि याबाबत पोलिसांकडे तक्रार केली होती.
हा ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आहेर यांच्यावर हल्ला केला होता. याप्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली होती. त्यात अभिजीत पवार, राष्ट्रवादीचे पदाधिकारी हेमंत वाणी, विक्रम खामकर, विशाल गायकवाड यांचा समावेश होता. या प्रकरणात सर्वजण जामिनावर बाहेर आहेत. तेव्हापासून पोलिसांनी सर्वांवर कारवाई सुरू केली होती.
अभिजीत आणि इतरांविरुद्ध खून, खंडणी यासारखे गंभीर गुन्हे दाखल झालेले नाहीत, तरीही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस खाते राजकीय पक्षाप्रमाणे काम करत आहे. राज्यात सुरू असलेली प्रशासकीय सूडबुद्धीची भावना खेदजनक आहे. मलाही एका प्रकरणात गोवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. माझ्याविरुद्ध साक्ष देण्यासाठी पोलिसांनी काही लोकांना ५ कोटी देऊ केले होते.
जितेंद्र आव्हाड, आमदार, राष्ट्रवादी
मार्च महिन्यात नौपाडा पोलिसांनी नोटीस बजावली होती. नोटीसमध्ये चौघांना ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, पालघर आणि रायगड जिल्ह्यात दोन वर्षांसाठी बंदी घालण्याबाबत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. प्रत्येकाने उत्तरासाठी मुदत मागितली होती. ही मुदत दोन दिवसांपूर्वी संपली. यानंतर ठाणे पोलिसांनी रविवारी अभिजीत पवार याला अटक करून जिल्ह्याबाहेर नेल्यानंतर सोडून दिले.
या जिल्ह्यांमध्ये दोन वर्षांसाठी बंदी
ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, पालघर आणि रायगड