‘…तर कदाचित ही दुर्घटना घडली नसती’; मद्यधुंद डंपर चालकाने 9 जणांना चिरडल्यानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया

पुणे : पुण्यातील वाघोलीत पोलीस चौकी समोरील फूटपाथवर झोपलेल्या 9 जणांना डंपरने चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यापैकी तिघांचा जागीच जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश असून जखमींपैकी तीन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सांगण्यात येत आहे.
पुण्यातील वाघोली येथील केसनांद फाट्यावर रात्री 12 ते 1 च्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये एक २२ वर्षाचा तरुण, एक वर्षाची मुलगी आणि दोन वर्षाच्या मुलाचा समावेश आहे.
या घटनेतील आरोपी गजानन शंकर तोट्रे हा डंपर चालक दारू पिऊन डंपर चालवित असल्याचे तपासात समोर आले असून त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे.
हेही वाचा – डायमंड पार्क्सच्या ख्रिसमस चॅरिटी ड्राईव्हद्वारे प्रेमाचा प्रकाश पसरविण्याचा उपक्रम
रोहित पवार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये गरिबांना जगण्याचा अधिकारच नाही का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले आहेत की, “तुम्ही गरीब असाल, तुमच्या डोक्यावर छत नसेल आणि धरती हे अंथरूण तर आकाश हेच पांघरूण असेल तर तुम्ही किड्या मुंग्यासारखे चिरडून मेलात तरीही त्याचं कुणालाच काहीच देणंघेणं नाही… असं वाटण्याची परिस्थिती म्हणजे वाघोली केसनंद इथं पोटाची खळगी भरण्यासाठी अमरावतीहून आलेल्या आणि दमून भागून रस्त्याच्या कडेला झोपलेल्या कामगारांना काळ बनून आलेल्या मद्यधुंद डंपर चालकाने अक्षरशः चिरडलं. यात दोन चिमुकल्यांसह तिघांनी उपाशीपोटीच जगाचा निरोप घेतला तर अजूनही सहाजणांची मृत्यूशी झुंज सुरुय… अंगावर काटा आणणाऱ्या या घटना का थांबत नाहीत? की गरिबांना जगण्याचा अधिकारच नाही का?”, असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे
पुढे रोहित पवार म्हणाले, “सकाळी सकाळी ही बातमी पाहून मन सुन्न झालं… ज्या रोजगारासाठी हे कामगार पुण्यात आले होते तो रोजगार त्यांना अमरावतीतच उपलब्ध झाला असता तर कदाचित आजची ही दुर्घटना घडली नसती. मायबाप सरकार याची दखल घेणार की नाही?”, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच या भीषण दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांनी पीडितांच्या कुटुंबियांना भरपाई देण्याची विनंती सरकारला केली आहे.
डंपर चालक क्रमांक MH 12 VF 0437 याने दारू पिलेल्या अवस्थेत फुटपाथवर झोपलेल्या लोकांवर डंपर चढवला आहे. आरोपी डंपर चालक गजानन शंकर तोट्रे, 26 वर्षे रा. नांदेड यास ताब्यात घेतला आहे. आरोपीविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला असून वैद्यकीय चाचणी करून अटक करण्यात आली आहे. यात विशाल विनोद पवार (वय २२), वैभवी रितेश पवार (वय १) आणि वैभव रितेश पवार (वय २) या तीन जणांची मृत्यू झाला आहे.





