‘लाडकी बहीण’ योजनेमुळे आता महिलांना कर्ज’; मुख्यमंत्र्यांची घोषणा

भाईंदर : महिलांचे आर्थिक सक्षमीकरण अधिक बळकट करण्यासाठी ‘लाडकी बहीण’ योजनेला शासनाच्या इतर योजनांशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या माध्यमातून महिलांना विविध व्यवसाय व उपक्रमांसाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व अनुदानाचा आढावा घेतला असता, सर्वसाधारण कर्ज योजनांमध्ये परतफेड करणाऱ्यांचे प्रमाण सुमारे ५० टक्के असल्याचे दिसून येते. मात्र महिलांना बचत गट किंवा इतर माध्यमांतून दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या परतफेडीचे प्रमाण ९९ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे महिलांमध्ये कर्जाचा योग्य वापर करून सक्षम अर्थकारण उभारण्याची क्षमता असल्याचे स्पष्ट होते.
हेही वाचा – युनेस्को वारसा किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 400 कोटींचा निधी; राज्य सरकारची मोठी घोषणा
या पार्श्वभूमीवर महिलांना केवळ ‘लाडकी बहीण’योजनेअंतर्गत आर्थिक मदत देण्यापेक्षा त्या योजनेला इतर शासकीय योजनांशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अंतर्गत मुंबई बँकेच्या माध्यमातून महिलांना कोणताही जामीन किंवा हमी न देता विविध उपक्रमांसाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत शासनाकडून मिळणारी आर्थिक मदतच या कर्जाच्या परतफेडीसाठी उपयोगात आणली जाणार आहे.
दरम्यान, या उपक्रमामुळे महिलांना विविध क्षेत्रांत व्यवसाय सुरू करण्यास चालना मिळेल. शासनाच्या ‘ उमेद’ या उपक्रमामार्फत या प्रक्रियेची अंमलबजावणी केली जाणार असून जिल्हानिहाय उभारण्यात येणाऱ्या ‘उमेद मॉल’मध्ये महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होईल. त्यामुळे महिला उद्योग-व्यवसायात मोठ्या खाजगी संस्थांनाही स्पर्धा देतील, असा दावा फडणवीस यांनी केला.





