किरीट सोमय्या भाजपवर नाराज? प्रचार समितीचं सदस्यत्व सोमय्यांनी नाकारलं
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/09/Kirit-Somaiya--780x470.jpg)
Kirit Somaiya | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील पक्षांमध्ये जागा वाटपासंदर्भातही चर्चा सुरू आहेत. यावरूम महायुतीत धुसफूस सुरू असल्याचं बोललं जात आहे. अशातच भाजप नेते किरीट सोमय्या पक्षावर नराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
किरीट सोमय्या यांची विधानसभा निवडणूक संपर्कप्रमुखपदी नियुक्ती पक्षाकडून जाहीर करण्यात आली. मात्र, सोमय्या यांनी हे पद नाकारलं आहे. त्यामुळे सोमय्या नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात एक्स मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करून भाजपाच्या नेतृत्वाला नकार कळवला आहे.
सोमय्यांनी पोस्टमध्ये म्हटलं की, पक्षाच्या निवडणूक प्रचार समितीच्या सदस्यपदी माझी नियुक्ती केल्याबद्दल मी महाराष्ट्र भाजपाचे आभार मानतो. मात्र मी हे पद स्वीकारण्यास असमर्थ आहे, त्याबद्दल खेद व्यक्त करतो. मी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना सांगितलं आहे की गेल्या साडेपाच वर्षांपासून मी भाजपाचा सामान्य सदस्य म्हणून काम करत आहे. तेच काम यापुढेही चालू ठेवेन. मात्र, मी प्रचार समितीत सहभागी होणार नाही.
हेही वाचा – संकेत बानकुळेंच्या बिलमध्ये बीफ कटलेटचा उल्लेख; संजय राऊतांचा मोठा दावा
किरीट सोमय्या यांनी रावसाहेब दानवे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून माझ्या नावाची मला न विचारता घोषणा केली ही पद्धत चुकीची आहे, हे मला अमान्य आहे. आपण यासाठी अन्य कोणाची तरी नियुक्ती करावी.
दरम्यान, यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. माजी खासदार किरीट सोमय्या हे भाजपाचे वरिष्ठ नेते आहेत. मात्र, पक्षाचे नेतृत्व हे कोणाला विचारून एखादे पद किंवा जबाबदारी देत नाही, याबाबत तसा नियमही आहे. आता कोणाला आमदारकी द्यायची असेल तर पक्ष विचारत नाही. किंवा एखादी जबाबदारी द्यायची असेल तर विचारून देत नाही. मला प्रदेशाध्यपदाची जबाबदारी देण्यात आली, मलाही पक्षाने विचारलं नाही, तुम्ही काम करा सांगितलं. शेवटी पक्षाचा एक प्लॅटफॉर्म आहे आणि त्या अनुषंगाने किरीट सोमय्या यांना पक्षाने जबाबदारी दिली. ते ती जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडतील, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.