पत्रकार प्रा. रणजित इंगळे हत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी करा
चौथा स्तंभ पत्रकार संघटनेची मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्याकडे मागणी
![Journalist, Prof. Ranjit Ingle, Murder Case, CID, Investigate, 4th Pillar Pankar Association, Chief Minister, Home Minister, Pimpri, Marathi, News, Pune,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/Ranjeet-Ingale-Murder--780x470.jpg)
पुणे, पिंपरी:
राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांचे पालकत्त्व असलेल्या अकोला जिल्ह्यात शनिवारी रात्री दै. वृत्तरत्न सम्राटचे अकोला प्रतिनिधी प्रा. रणजित इंगळे यांची निर्घृण हत्या करण्यात आली. याचा निषेध चौथा स्तंभ संपादक, पत्रकार व सोशल मीडिया संघ आणि पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील पत्रकार तसेच सामाजिक संघटना यांच्या वतीने मंगळवारी (दि.२०) पुण्यात करण्यात आला. तसेच या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
अशा मागणीचे पत्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विकास कडलक यांनी पुणे उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना मंगळवारी (दि. २०) दिले. यावेळी संघटनेचे संस्थापक सचिव दिलीप देहाडे, पुणे जिल्हाध्यक्ष तथा सम्राटचे पुणे पिंपरी चिंचवड शहर प्रतिनिधी दत्ता सूर्यवंशी, पुणे शहर अध्यक्ष विनोद बचुटे, उपाध्यक्ष सुनील गायकवाड, बाळासाहेब भालेराव, धम्मक्रांती महोत्सव समितीचे अध्यक्ष इंद्रजित भालेराव, शाहू, फुले, आंबेडकर विचार मंच चे विजय जाधव, पुणेकर माझा चॅनेलचे संपादक संतोष शिंदे, मैनुउद्दीन अत्तार, मिलिंद माने, पत्रकार यशवंत शिंदे आदी उपस्थित होते.
दै. वृत्तरत्न सम्राट चे अकोला जिल्हा प्रतिनिधी म्हणून प्रा. रणजित इंगळे हे काम करत होते. इंगळे हे दिव्यांग होते. अजात शत्रू व्यक्तिमत्तव होते. एका सामाजिक कार्याचा वसा चालविणारे आणि पत्रकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्यक्तिची अशा प्रकारे हत्या होते हि घटना संतापजनक आहे. त्यामुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे याकडे सरकारने लक्ष द्यावे. प्रा. रणजीत इंगळे यांच्या हत्येची सीआयडी चौकशी करावी आणि प्रा. इंगळे यांच्या कुटुबांला ५० लाखाची मदत द्यावी व आरोपींना अटक करून कडक कारवाई करावी अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.