‘नार्वेकर तर मोठे वकील आहेत, आम्ही अनपढ आहोत’; जितेंद्र आव्हाडांची खोचक टीका
![Jitendra Awad said that Narvekar is a great lawyer, we are illiterate](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/rahul-narvekar-and-jitendra-awhad-780x470.jpg)
मुंबई : राज्यातील सत्तसंघर्षाच्या बाबत १६ आमदारांच्या अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्षांवर सोपवला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यावर काय निर्णय घेणार याकडे संपुर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने १६ आमदारांच्या अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्षांवर सोपवला आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर विधानसभा अध्यक्ष टिप्पणी करतात. त्यामुळे या दोन्ही गोष्टींमध्ये विरोधाभास असल्याचे मत माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांसमोर व्यक्त केले.
हेही वाचा – सिध्दरामय्या होणार कर्नाटकचे मुख्यमंत्री? उद्या होणार शपथविधी!
राजकीय पक्षानेच व्हीप आणि नेत्याची नेमणूक करायची असे सुप्रीम कोर्टाच्या निकालात सांगण्यात आले आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालावर विधानसभा अध्यक्षांनी टीका-टिप्पणी करणे म्हणजे त्यांनी एका बाजूला सरकण्यासारखे आहे. तसेच विधानसभा अध्यक्षांनी एका बाजूने विचार न करता सर्वोच्च न्यायालयाला जे अभिप्रेत आहे त्यापद्धतीने वागावे, अशी अपेक्षा जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली.
राजकीय पक्षाने नेते आणि व्हीप नेमणे अपेक्षित आहे, हे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. कोण राजकीय पक्ष होता? महाराष्ट्राला मूर्ख समजता का? शिवसेना पक्ष शिंदे गटाकडे फेब्रुवारीमध्ये गेला. २२ जुलैला त्यावरून निर्णय कसा लावणार? मला आश्चर्य वाटतेय त्यांच्या सारखा सुशिक्षित चतुर असे कसे काय बोलू शकतो? हे रूल बुक आहे. नार्वेकर तर मोठे वकील आहेत, आम्ही अनपढ आहोत, अशी खोटक टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.