‘बाप नाय तुझा काकच पुर्ण करणार’; जयंत पाटलांचं अजितदादांना जोरदार प्रत्युत्तर
![Janyat Patil told Ajit Pawar that Bap Nai will complete your work](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/11/BJP-Maharashtra-1-780x470.jpg)
Jayant Patil | इंडिया आघाडीची ६ नोव्हेंबरला मुंबईत सभा झाली. यात यात काही गॅरंटी महाराष्ट्रतील जनतेला देण्यात आल्या. यावर यांनी एवढ्या घोषणा केल्यात, हे सगळं कसं पूर्ण करणार? अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीवर केली. अजित पवारांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
जयंत पाटील म्हणाले, की महाराष्ट्रात आता परिवर्तन होणार आहे. राज्यातील युतीचे सरकार जाऊन महाविकास आघाडीचे सरकार येईल, याची आम्हा सर्वांना खात्री आहे. शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रमुख व ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकार महाराष्ट्रातील जनतेची सेवा करणार आहे. महाराष्ट्रातील जनतेसाठी आम्ही (मविआ) पाच महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत आणि आम्ही त्या पूर्ण करण्यावर ठाम आहोत.
हेही वाचा – ‘लाडक्या बहिणींना २१०० रुपये, शेतकऱ्यांना कर्जमाफी ; भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध
राज्यात आमचं सरकार आल्यावर महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला ३,००० रुपये देणार आहोत. तसेच महिला व मुलींना मोफत बस प्रवास लागू करणार आहोत. शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ केले जाईल. तसेच नियमित कर्जफेडीसाठी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन देऊ. आम्ही जातीनिहाय जनगणना करणार असून ५० टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर बेरोजगार तरुणांना दर महिन्याला ४,००० रुपयांपर्यंतची मदत दिली जाणार. आमचं सरकार सत्तेत आल्यावर आम्ही प्रत्येक कुटुंबाचा २५ लाख रुपयांचा विमा काढणार आहोत. जेणेकरून त्या कुटुंबातील कोणताही सदस्य उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झाल्यावर त्याला कुठेही पैसे खर्च करावे लागणार नाहीत, असं जयंत पाटील म्हणाले.
रविवारी (१० नोव्हेंबर) महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाईल. त्यात राज्यातील जनतेसाठी आम्ही काही महत्त्वाच्या घोषणा करणार आहोत. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री काही दिवसांपूर्वी सांगलीला गेले आणि तिथे त्यांनी असं वक्तव्य केलं की या लोकांनी (महाविकास आघाडी) एवढ्या घोषणा केल्यात, यांच्या बापालाही त्या पूर्ण करता येणार नाहीत. मला त्यांना सांगायचं आहे, अरे बापाला नाही तुझा काकाच या घोषणा पूर्ण करणार आहे. बापाचा इथे विषयच नाही. तुमचे काका ही सगळी आश्वासनं पूर्ण करणार आहेत. तुम्ही त्याची काळजी करू नका. एक ना धड भाराभर चिंध्या असा त्यांचा (महायुतीचा) कार्यक्रम आहे. आम्ही सध्या पाच महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत आणि आम्ही त्यावर ठाम आहोत, असंही जयंत पाटील म्हणाले.