राजकीय पक्षांना निवडणूक चिन्ह कसं आणि कोण देतं? काय आहेत नियम
![How and who gives election symbols to political parties](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/Election-Symbols-Political-Parties-780x470.jpg)
Election Symbols Political Parties : देशभरातील ५ राज्यांमध्ये विधानसभा निवडणूका जाहीर झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सगळेच राजकीय पक्ष मोठ्या ताकतीसह निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. तसेच जसजशी निवडणूक जवळ येत आहे तसतशा बऱ्याच ठिकाणी मोठ्या राजकीय घडामोडी घडताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. तेलंगणा राज्यात देखील निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. तेलंगणामध्ये बीआरएस पक्षासह भाजप आणि काँग्रेस पक्षातील सर्व नेते दिवस रात्र एक करून प्रचार करत आहेत.
निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच बीआरएस पक्षाने निवडणूक लढवत असलेल्या अन्य पक्षांना देण्यात आलेल्या निवडणूक चिन्हांवर आक्षेप घेत, सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर निर्णय देत सुप्रीम कोर्टाने २० ऑक्टोबरला बीआरएस पक्षाची ही याचिका फेटाळून लावली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज आपण पाहुयात बीआरएस पक्षाने न्यायालयात दाखल केलेली याचिका काय होती आणि या याचिकेद्वारे कोणती मागणी न्यायालयाकडे करण्यात आली होती? राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाकडून चिन्हांचा वाटप कसं केलं जातं? त्यासाठी असणारा नियम काय सांगतो? अशा प्रकारच्या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात आमच्या या आजच्या लेखाच्या माध्यमातून.
हेही वाचा – मनोज जरांगेंच्या उपोषणावरून संभाजीराजेंचं मोठं विधान; म्हणाले..
राजकीय पक्षांना निवडणूक चिन्हांचं वाटप कोण करतं?
आपल्या देशात तरी सर्वच राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाकडूनच निवडणूक चिन्हांचं वाटप करण्यात येत असतं. १९६८ मधील निवडणूक चिन्हे आदेशानुसार या सगळ्या प्रक्रियेची जबाबदारी निवडणूक आयोगावर सोपवलेली आहे. या आदेशानुसारच निवडणूक आयोग पक्षांना चिन्हांचे वाटप करत असते. निवडणूक आयोगाकडून देण्यात येणारी काही विशिष्ठ चिन्हे राखीव ठेवलेली असतात. याचा अर्थ असा की राखीव असलेले संबंधित निवडणूक चिन्ह हे एखाद्या राष्ट्रीय अथवा राज्य स्तरावर असलेल्या पक्षाला त्या पक्षाला मिळालेल्या मतांच्या आधारे दिलेले असते. आणि हेच कारण आहे की ज्यामुळे इतर कोणत्याही पक्षाला ते संबंधित चिन्हे हे पक्ष चिन्ह म्हणून वापरता येत नाही.
यातून असे समोर येते की अशा प्रकारची चिन्हे ही राखीव असतात. मात्र निवडणूक आयोगाकडे असलेली काही चिन्ह ही राखीव नसून ते इतर कोणत्याही पक्षाने घेतलेली नाहीत अशा उरलेल्या पण निवडणूक आयोगाने नोंदणीकृत असलेल्या चिन्हांची निवड ही इतर राजकीय पक्ष आणि उमेदवारांना करता येते. तसेच राखीव नसलेली पक्ष चिन्हे ही एखाद्या निवडणुकीत संबंधित पक्षाला ते चिन्ह दिले तर ते त्या निवडणुकीपुरतेच मर्यादित असते. निवणूक संपल्यानंतर संबंधित पक्षाला त्या निवडणूक चिन्हावर कोणत्याही प्रकारचा हक्क सांगता येत नाही. तसेच पुढे होणाऱ्या इतर कोणत्याही निवडणुकीसाठी कोणताही पक्ष किंवा उमेदवार ते चिन्ह पक्ष चिन्ह म्हणून वापरू शकतो.