Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

शिवसेना नावावरून खडाजंगी; नोंदणीकृत नाव स्क्रीन वर दाखवले जाईल उप सभापती सचिन अहिर यांचे निर्देश

मुंबई : विधान परिषदेत गुरुवारी राजकीय पक्षांच्या अधिकृत नावांच्या उल्लेखावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक रंगली. सभागृहातील कागदपत्रे आणि डिजिटल स्क्रीनवर “उभाठा असा उल्लेख न करता अधिकृत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असा पूर्ण पद्धतीने दाखवावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित करताना राजकीय पक्षांची निवडणूक आयोगाकडे ज्या नावाने नोंदणी आहे, त्याच नावाने सभागृहात उल्लेख होणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावर पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर दिले. निवडणूक आयोगाने “शिवसेना” हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला दिले आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची अधिकृत नोंदणी “शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाने आहे. स्क्रीनवरील जागेच्या मर्यादेमुळे काही वेळा नाव संक्षिप्त स्वरूपात दाखवले जाते, असे त्यांनी सांगितले.

या स्पष्टीकरणानंतर विरोधकांनी आक्षेप घेतला. त्यानंतर उप सभापतींनी हस्तक्षेप करत हा विषय गंभीर असल्याचे नमूद केले. त्यांनी स्पष्ट निर्देश दिले की, निवडणूक आयोगाकडे ज्या नावाने पक्षाची नोंदणी आहे, त्याच नावाचा कोणताही शॉर्ट फॉर्म न करता पूर्ण उल्लेख सभागृहातील स्क्रीन आणि अधिकृत कागदपत्रांमध्ये करण्यात यावा. याबाबत आवश्यक तांत्रिक बाबी तपासून पुढील कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

हेही वाचा –  भारतात ऑस्ट्रेलियाची सुपर इन्व्हेस्टमेंट! 500 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक, पीएम मोदी म्हणाले काय?

भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी विरोधकांवर निशाणा साधत, “हा विषय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मांडायला हवा होता. आता अधिवेशन संपायला अवघा एक दिवस शिल्लक असताना हा मुद्दा उपस्थित करणे म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण’आणि बैल गेला आणि झोपा केला’ अशी विरोधकांची अवस्था आहे,” असा टोला लगावला. त्यावर विरोधी बाकांवरूनही जोरदार प्रतिक्रिया उमटल्या आणि काही काळ सभागृहात गदारोळाचे वातावरण निर्माण झाले.

अखेरीस उप सभापती सचिन अहिर यांनी सत्ताधारी आणि विरोधका मध्ये मध्यस्थी करताना दोन्ही बाजूच्या सदस्यांना बसायला सांगितले. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून निर्णय देताना स्पष्ट केले की, यापुढे विधान परिषदेच्या सर्व अधिकृत नोंदी, कागदपत्रे आणि डिजिटल स्क्रीनवर राजकीय पक्षांचे निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत असलेले पूर्ण अधिकृत नावच कोणताही संक्षेप न करता प्रदर्शित करण्यात येईल.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button