‘घरात जेवण करायला सांगा तेही करू, पण मतदान महायुतीला करा’; हसन मुश्रीफ यांचं विधान चर्चेत
![Hasan Mushrif said, "Ask them to have dinner at home, we will do it, but vote for the Grand Alliance."](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/Hasan-Mushrif-780x470.jpg)
Hasan Mushrif | महायुती सरकारने नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणणा केली आहे. मात्र, या योजनेवरून विरोधक सरकारवर टीका करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांनी केलेल्या एका विधानाची चांगलीच चर्चा रंगली आहे. सरकारने इतक्या योजना आणल्या आहेत. आता घरात जेवण करायला सांगा तेही करू, पण मतदान महायुतीला करा, असं त्यांनी म्हटलं आहे. ते रविवारी एका कार्यक्रमात बोलत होते.
हसन मुश्रीफ म्हणाले, केसरी आणि पिवळ्या रेशन कार्डवर मोफत धान्य देण्याची योजना सरकारने सुरू ठेवलेली आहे. तसेच प्रत्येक सणाला वस्तु फक्त १०० रूपयांना सरकार देतं. तसंच येणाऱ्या गणपती उत्सवालाही आता चणा डाळ, साखर, रवा, तेल हे सुद्धा आपण देत आहोत. आता सरकारने येवढ्या मोठ्या योजना आणल्या आहेत. आता घरात जेवण करायला सांगा तेही आम्ही करू, पण मतदानावेळी फक्त महायुतीचं बटणं दाबा.
हेही वाचा – ‘येत्या काही दिवसांमध्ये आपलं सरकार येणार’; खासदार सुप्रिया सुळेंचं विधान
दरम्यान, हसन मुश्रीफांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सत्ताधारी काहीही घोषणा करतील. आता आमच्या घरी म्हणजे जनतेच्या घरी जेवण करण्यासाठी येण्याची त्यांची तयारी आहे. म्हणजे हे किती घाबरलेले आहेत. आता हे किती शरण जायला लागले आहेत. त्यांचं सरकार जाणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. त्यामुळे आता जेवण तयार करायला घरी येतो असं म्हणायला लागले आहेत. उद्या अंघोळ घालायलाही येतील, असं जयंत पाटील म्हणाले.