breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडराजकारणसंपादकीय

ग्राऊंड रिपोर्ट : राहुल कलाटेंची माघार म्हणजे ठाकरे गटाचे पिंपरी-चिंचवडमधील अस्तित्वच संपुष्टात?

  • चिंचवडमधील एकमेव प्रभावी चेहरा पण… संधी मिळेना
  • पिंपरी आणि भोसरीतही ठाकरे गटाला संधी नाही

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांची चिंचवड पोटनिवडणुकीत माघार घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत: कलाटेंची संपर्क केला आहे. मात्र, कलाटेंची माघार म्हणजे ठाकरे गटाचे पिंपरी-चिंचवडमधील अस्तित्व संपुष्टात… अशी खंत ठाकरे गटाच्या निष्ठावंत शिवसैनिकांकडून व्यक्त होत आहे.

चिंचवड विधानसभा मतदार संघात शिवसेनेला मानणारा मोठा मतदार आहे. २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत या मतदार संघातून शिवसेनेचे ६ नगरसेवक निवडून आले आहेत. या निवडणुकीतील मतदानाची आकडेवारी पाहता शिवसेना दुसऱ्या क्रमांवर आणि राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमांकावर आहे. २०१४ मध्ये कलाटे यांनी शिवसेनेच्या तिकीटावर विधानसभा लढवली होती. त्यावेळी क्रमांक दोनची मते घेवून कलाटे या मतदार संघात दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना पर्याय होवू शकतात, यावर शिक्कामोर्बत झाले होते. त्यानंतर २०१९ मध्ये सर्वपक्षीयांच्या पाठिंब्यांने जगताप यांना आव्हान देण्यात कलाटे यशस्वी झाले होते. याच अनुशंगाने कलाटे यांनी उमेदवारीवर दावा केला होता.

मात्र, पोटनिवडणुकीतील जागा वाटपामध्ये राहुल कलाटे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून प्रमुख दावेदार असताना राहुल कलाटे यांना उमेदवारीमध्ये डावलण्यात आले. महाविकास आघाडीकडून विठ्ठल उर्फ नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली.

राहुल कलाटे यांनी आपली खंत व्यक्त करीत चिंचवड मतदार संघात राष्ट्रवादीचा आमदार २००९ पासून विजयी होवू शकला नाही. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना पिंपरी-चिंचवड शहर कळलेच नाही, अशी टीका केली होती. भारतीय जनता पार्टी आणि प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला थेट आव्हान देणारा चेहरा म्हणून राहुल कलाटे यांची ओळख आहे. दिवंगत जगताप यांना दोन हात करण्याचे धाडस कलाटे यांनी दाखवले होते. त्यामुळे कलाटे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी पिंपरी-चिंवचडमधील आश्वासक चेहरा आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठकारे गटाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी राहुल कलाटे यांना संधी मिळणे अपेक्षीत होते. मात्र, जागा वाटपात महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादीने दावा केला. आता कोणाची ताकद जास्त आहे हे एकदा जाहीर होवू दे… माघार नको… लढाई झाली पाहिजे, असा सूर शिवसेना ठाकरे गटाला मानणाऱ्या कार्यकर्त्यांकडून बोलून दाखवला जात आहे. कारण, या निवडणुकीचा परिणाम आगामी महापालिका आणि विधानसभा, लोकसभा निवडणुकीत होणार आहे. ही बाब पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लक्षात घेतली पाहिजे आणि कलाटे यांना आपली ताकद आजमावण्याची संधी दिली पाहिजे.

मग शहरात कोणत्या मतदार संघात ठाकरे गट लढणार?

पिंपरी-चिंवचड शहरामध्ये तीन विधानसभा मतदार संघ आहेत. पिंपरी मतदार संघात राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे आहेत. भोसरीमध्ये राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार विलास लांडे आणि शहराध्यक्ष अजित गव्हाणे उमेदवारीवर दावा करणार आहेत. आता चिंचवडमध्ये नाना काटे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीने आपला उमेदवार दिला आहे. आगामी महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा एकतरी आमदार असावा, अशी अपेक्षा निष्ठावंत शिवसैनिकांकडून व्यक्त केली जात आहे.

राष्ट्रवादी ठाकरे गटाचा ‘गेम’ करीत आहे का?

पिंपरी-चिंचवडमध्ये निर्णायक मतदार असतानाही राष्ट्रवादीकडून शिवसेना ठाकरे गटाला संधी दिली जात नाही. वास्तविक, चिंचवडची जागा ‘मशाल’ चिन्हावर लढावी, अशी अपेक्षा शिवसैनिकांकडून व्यक्त होत होती. मात्र, राष्ट्रवादीने सुरूवातीलपासून ‘घड्याळ’ च्या चिन्हाचा आग्रह धरला. चिंचवड, भोसरी आणि पिंपरीत संधी मिळाली नाही. तर पुढील दहा वर्षांत ठाकरे गटाला शहरात पाय रोवता येणार नाहीत. ठाकरे गटाचा शहरातील एकमेव आक्रमक चेहरा राहुल कलाटे यांनाही डावलण्यात आले. त्यामुळे चिंचवड पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाकरे गटाचा ‘गेम’ करीत आहे का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाचा एकही आमदार नाही, अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसने मनाचा मोठेपणा का दाखवला नाही? अशी खंतही शिवसैनिक व्यक्त करीत आहेत.

वंचित बहुजन आघाडी… शिवसेनेसोबत

२०१९ मध्ये राहुल कलाटे यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यावेळी वंचित बहुजन आघाडीने कलाटे यांना पहिल्यांदा पाठिंबा दिला होता. आताच्या घडीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासेबत वंचितने युती केली आहे. मात्र, राष्ट्रवादी आणि वंचित यांच्या सर्व अलबेल नाही. परिणामी, वंचितचा कार्यकर्ता राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे काम करणार नाही. याचा फटका महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी लढवल्यास वंचित थेटपणे सोबत येणार असून, या मतदार संघात वंचित बहुजन आघाडी आणि डॉ. प्रकाश आंबेडकरांवर प्रेम करणारा निर्णायक मतदार आहे. यासह राष्ट्रवादी आणि भाजपाविरोधी मतदार कलाटेंच्या पारड्यात मतदान करु शकतो. दुसरीकडे, राहुल कलाटे यांनी यापूर्वी, दोनदा विधानसभा निवडणूक लढवली आहे. त्यामुळे आता माघार घेणे म्हणजे राष्ट्रवादीसमोर गुडघे टेकणे… असा मॅसेज तळागाळात जाणार आहे. त्यामुळे कलाटे यांची माघार म्हणजे भविष्यातील ठाकरे गटाचे अस्तित्व आणि कलाटेंचे राजकीय वाटचालीला अधोगती… असा मतदार संघातील ‘अंडर करंट’ आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button