दशावतार, नमन, खडी गंमत, झाडीपट्टी कलाकारांचे अनुदान दुप्पट होणार; सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : राज्यातील दशावतार ही केवळ लोककला नसून, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि पारंपरिक वारशाचा अविभाज्य भाग आहे. या कलेचे जतन व संवर्धन करण्यासाठी दशावतारासह लोककला अनुदानाची रक्कम २ कोटी २२ लाख रुपयांवरून ४ कोटी ४० लाख रुपयांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कलाकारांना थेट त्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना केली.
निलेश राणे यांनी दशावतारी कलाकारांच्या विविध समस्यांसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली असता मंत्री ॲड.शेलार यांनी घोषणा केली. या लक्षवेधीत सदस्य भास्कर जाधव, सुनील प्रभू यांनीही सहभाग घेतला.
ॲड.शेलार म्हणाले, कोकणातील दशावतार कलेने राज्यासह देश-विदेशात महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख निर्माण केली आहे. या कलेसाठी कार्यरत असलेल्या कलाकारांच्या विविध मागण्यांबाबत बैठक घेण्यात आली होती. त्या बैठकीत राज्यस्तरीय समितीचा विस्तार करण्यात आला असून देवेंद्र नाईक, दत्ताप्रसाद शेणई, संतोष रेडकर, राजाराम धुरी आणि शरद मोचेमाडकर यांचा समितीत समावेश करण्यात आला आहे.
हेही वाचा – अखेर प्रतिक्षा संपली.. राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय; राज्यातील वनपट्टाधारकांना आता…
१ जानेवारी २००८ च्या शासन निर्णयानुसार पूर्णवेळ तमाशा, हंगामी तमाशा, दशावतार, खडी गंमत तसेच शाहिरी व संगीत बारी या लोककलांना भांडवली व प्रयोगात्मक अनुदान दिले जाते. मात्र अनुदानाचा लाभ कलाकारांपर्यंत थेट पोहोचावा, यासाठी नव्या निर्णयानुसार वाढीव निधीपैकी निम्मी रक्कम कलाकारांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येईल, तर उर्वरित रक्कम कलापथक चालकांना देण्यात येईल. यासंदर्भातील शासन निर्णय पुढील १५ दिवसांत निर्गमित करण्यात येणार असल्याचे शेलार यांनी सांगितले.
दशावतार कलाकारांची नोंदणी, जिल्हास्तरावर प्रत्यक्ष पडताळणी तसेच लोककलावंतांना ओळखपत्र देण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे. यासाठी विभागीय अधिकारी जिल्हास्तरावर जाऊन नोंदणी प्रक्रिया राबवतील. दशावतार महोत्सव, नमन महोत्सव तसेच राज्य सांस्कृतिक पुरस्कार योजनेंतर्गत दशावतार कलेसाठी तीन लाख रुपयांचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार आणि एक लाख रुपयांचा राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार देण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
राज्यातील भारूड, शंकासूर आणि शक्तीतुरा या लोककलांचे महोत्सव राज्यातील प्रत्येक विभागात आयोजित करण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे. तसेच कोकणासह राज्यातील भजनी मंडळांना भांडवली साहित्य खरेदीसाठी सुरू असलेली अनुदान योजना अधिक व्यापक करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
‘देव खेळ’ या वेब सिरीजमध्ये लोकपरंपरेचा विपर्यास झाल्याबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेऊन संबंधित वेब सिरीजविरोधात पोलिस कारवाई करण्याचे तसेच केंद्र शासनालाही याबाबत कळविण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती मंत्री ॲड. शेलार यांनी दिली. या शिवाय, राजर्षी शाहू महाराज वृद्ध कलाकार मानधन योजनेत पात्र दशावतार कलाकारांचा समावेश करण्यासाठी जिल्हास्तरीय समित्यांमार्फत कार्यवाही करण्यात येईल. भजनी कलाकारांच्या विविध मागण्यांबाबत स्वतंत्र बैठक घेऊन निर्णय करण्यात येईल, असेही शेलार यांनी सांगितले





