घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळल्याची घटना, तिघांचा मृत्यू
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून चौकशीचे निर्देश
मुंबई : मुंबईतील वादळामुळे घाटकोपरच्या पूर्व द्रुगती मार्गावरील पेट्रोल पंपावर मोठं लोखंडी होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून ५९ जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच आतापर्यंत ६७ जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. दरम्यान, या घटनेनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी माध्यमांशी बोलताना, या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिल्याचे त्यांनी सांगितले.
काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
ही घटना अतिशय दुर्देवी आहे. या घटनेची माहिती मिळताच मी लगेच मुंबई महापालिकेतील आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. याठिकाणी महापालिकेचे अधिकारी पोहोचले आहेत. तसेच बचावकार्य सुरू आहे. या घटनेत जखमी झालेल्यांना रुग्णालयात उपाचराकरिता दाखल करण्यात आले आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
पुढे बोलताना मुंबईतील सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश आयुक्तांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईतील सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश आम्ही आयुक्तांना दिले आहेत. तसेच जे होर्डिंग अनाधिकृत आहेत, त्यावर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याचे आदेशही सरकारने आयुक्तांना दिले आहेत, असे ते म्हणाले. तसेच या घटनेत जखमी झालेल्यांच्या उपचाराचा खर्च सरकार करणार असून या घटनेत ज्यांच्या मृत्यू झाला आहे, त्यांना मुख्यमंत्री साहायता निधीतून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.





