‘प्रभू राम फक्त हिंदूंचे नाही, तर..’; फारूख अब्दुल्ला यांचं विधान चर्चेत
![Farooq Abdullah said that Lord Ram is not only for Hindus but also for everyone in the world](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Farooq-Abdullah-1-780x470.jpg)
नवी दिल्ली : आयोध्येतील राम मंदिराचं २२ जानेवारीला उद्घाटन होणार आहे. भाजपाकडून याबाबत जोरदार वातावरण निर्मिती केली जात आहे. यावरून जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी मोठं विधान केलं आहे. फारूख अब्दुल्ला यांनी अयोध्येत राम मंदिर निर्माणासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या लोकांना शुभेच्छा दिल्या. तसेच प्रभू राम हे केवळ हिंदूंचे नाही तर संपूर्ण विश्वाचे आहेत, असेही ते म्हणाले.
फारूख अब्दुल्ला म्हणाले, राम मंदिराचे उद्घाटन होत आहे. मंदिर उभे करण्यासाठी हातभार लावणाऱ्या प्रत्येकाचे मी अभिनंदन व्यक्त करतो. तसेच मी हे सांगू इच्छितो की, प्रभू राम हे फक्त हिंदूंचे नाहीत तर ते विश्वातील प्रत्येकाचे आहेत. ते या विश्वातील प्रत्येक व्यक्तीचे श्रद्धास्थान आहेत. हे ग्रंथातदेखील लिहिले आहे.
हेही वाचा – ‘राम मंदिर उद्घाटनादिवशी दिवाळी साजरी करा’; पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आवाहन
प्रभू रामाने आपल्याला बंधूभाव, प्रेम, न्याय आणि एकमेकांना सहकार्य करण्याचा संदेश दिलेला आहे. श्रीराम यांनी कुणाचाही जाती-धर्म न पाहता कमकुवत किंवा उपेक्षित असलेल्यांना मदत करण्याची, त्यांना पुढे आणण्याची भूमिका घेतली. त्यांनी एक वैश्विक संदेश आपल्याला दिला आहे. आता राम मंदिराचे उदघाटन होत आहे. यानिमित्ताने मी देशातील लोकांना सांगू इच्छितो की, आपल्या देशातील कमी होत असलेला बंधूभाव पुन्हा एकदा स्थापन करण्यासाठी प्रयत्न करूयात. मी भारतातील प्रत्येक नागरिकाला आवाहन करतो की, बंधूभाव वाढविण्यासाठी पुढाकार घ्या, असं फारूख अब्दुल्ला म्हणाले.