Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘विदर्भाच्या सर्वांगीण विकासावर भर’;  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : गडचिरोली येथे जगातील सर्वात मोठे ग्रीन स्टील हब, नागपुरात सोलर मॉड्युल आणि अमरावतीमध्ये आशिया खंडातील सर्वात मोठे वैमानिक प्रशिक्षण केंद्र उभारण्याच्या दिशेने महत्त्वाची पावले पडली आहेत. निर्मिती आणि सेवा क्षेत्रात विदर्भाची घोडदौड सुरु आहे. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीसोबत झालेल्या सामंजस्य करारातून नागपूरमध्ये ऑटोमोबाईल उद्योगाचे पदार्पण झाले आहे, या सर्व प्रयत्नांतून येत्या ५ वर्षांत विदर्भाचा सर्वांगीण विकास साधण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. त्यांच्या उपस्थितीत विदर्भासाठी विविध चार गुंतवणूक करारही करण्यात आले.

असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटच्यावतीने आयोजित  ‘खासदार औद्योगिक महोत्सव- ॲडव्हान्टेज विदर्भ-२०२६’ च्या तिसऱ्या आवृत्तीचे  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठ परिसरात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर ,आमदार सर्वश्री  डॉ.परिणय फुके, चरणसिंह ठाकूर, सुमित वानखेडे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बळगन, उद्योजक पद्मश्री सत्यनारायण नुवाल आणि देश-विदेशातील उद्योजक  यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अनेक वर्षांपासून नागपुरात ऑटोमोबाईल उद्योग आणण्यासाठी प्रयत्न सुरु होते ते आज फळाला आले आहेत. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने नागपुरात एकात्मिक ऑटोमोबाईल क्षेत्रात १५ हजार कोटी गुंतवणुकीचा सामंजस्य करार करून आपल्या पुढील योजनेविषयी महत्वाची घोषणाही केली आहे. या गुंतवणुकीतून भारत आणि जागतिक बाजारासाठी नेक्स्ट जनरेशन इलेक्ट्रिक व्हेईकल आणि ट्रॅक्टरचे नागपुरात उत्पादन होणार आहे. या प्रकल्पासाठी जागा निश्चितच करण्यात येणार आहे. कंपनीने छत्रपती संभाजीनगर येथे पुरवठा केंद्र तर नाशिक येथे विस्तार केंद्र उघडण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे पुणे शहरानंतर राज्यात आता नागपूर,नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांमध्ये देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल परिसंस्था निर्माण होणार आहे.

हेही वाचा –  ‘उमेद अभियानातून महिला उद्योजकांच्या आर्थिक सक्षमीकरणास मिळणार चालना’; जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

एन मोटिव्ह जर्मनी कंपनीसोबत प्रथमच गीगा कास्टिंग तंत्रज्ञानाधारित तीन चाकी इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात १० हजार कोटींचा करार झाला आहे. भविष्यात २५०० कोटींच्या गुंतवणुकीतून याचा विस्तार होणार असून ८० टक्के उत्पादनाची निर्यात होऊन ६ हजार प्रत्यक्ष व १० हजार अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्याच्या समतोल विकासासाठी उद्योग धोरण आखण्यात आले असून ज्या भागात उद्योग नाहीत अशा भागांचाही विकास साधला जाणार आहे. यासाठी राज्यात मॅग्नेट औद्योगिक क्षेत्र तयार करण्यात येत आहेत. विदर्भातही नागपूर आणि अमरावती असे मॅग्नेट तयार करण्यात आले आहेत. नागपूर मॅग्नेटद्वारे गडचिरोली,भंडारा,चंद्रपूर आणि नागपूर या जिल्हयांचा औद्योगिक विकास करण्यात येत आहे.

या भागात स्टिल हब तयार करण्यात येत आहे. गॅसबेस एनर्जीसाठी प्रयत्न सुरु असून येत्या काळात ग्रीन स्टील हब म्हणून या भागाचा विकास करण्यात येणार आहे.

अमरावती मॅग्नेटद्वारे अमरावती येथे पहिल्या टेक्सटाईल पार्कनंतर दुसरा टेक्सटाईल पार्क उभारण्यात येत आहे. अमरावती विमानतळाचा विस्तार करण्यात येईल येथेच आशिया खंडातील सर्वात मोठे वैमानिक प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येत असून येत्या जुलै महिन्यात त्याचे उद्घाटन होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अमरावती मॅग्नेटच्या माध्यमातून यवतमाळ, अकोला, वाशीम व बुलडाणा जिल्ह्यांचा औद्योगिक विकास करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या काळात उद्योजकांच्या पुढाकाराने विदर्भाचा विकास होईल, असा विश्वास व्यक्त करून  उद्योजकांना राज्य शासन पूर्ण मदत करेल असेही त्यांनी सांगितले.

उद्योगासाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल, रेल्वे व विमानवाहतूक बळकट करण्यात येईल, वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाद्वारे विदर्भाला दुष्काळमुक्त करण्याच्या ध्येयाने राज्य शासन कार्य करीत  असून यावर्षी  या दिशेने महत्वाचे पाऊल पडेल असे सांगून विदर्भातील पर्यटन क्षेत्रातील मोठ्या संधींचा उपयोग येथील विकासाकरिता करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button