breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

ठाण्यातल्या ‘या’ भागातील प्रत्येकाला नावानिशी ओळखतात मुख्यमंत्री शिंदे; हे आहे ठाण्याशी खास नाते

मुंबई | वागळे इस्टेट एमआयडीसीतील कामगारांसाठी वसलेल्या ‘किसननगर’मधील एका चाळीमध्ये एकनाथ शिंदे यांचे बालपण गेले. आईवडील आणि चार भावंड अशा कुटुंबामध्ये राहणाऱ्या एकनाथ शिंदे यांचे प्राथमिक शिक्षण ठाण्यातील किसननगर क्रमांक ३ ठाणे महापालिका शाळा क्रमांक २३ मधून झाले. होळी, दहिहंडी, गणेशोत्सव अशा उत्सवांसाठी जनजागृती मित्रमंडळाची स्थापना केली होती. वयाच्या विसाव्या वर्षी ते शिवसेनेशी जोडले गेले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या तालमीमध्ये एकनाथ शिंदे यांची राजकीय जडणघडण झाली. कुटुंबाच्या उदर्निवाहासाठी रिक्षा आणि टेम्पो चालवणारे एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेच्या नगरसेवकपदाची निवडणूक जिंकून राजकीय प्रवासाला सुरुवात केली.
राज्याचे तिसावे मुख्यमंत्री होण्याचा मान लाभलेल्या शिंदे यांच्या प्रवासाचा साक्षीदार असलेल्या ‘किसननगर’मधून आनंदोत्सव साजरा होत असताना ठाण्याच्या विकासाची अपेक्षाही केली जात आहे. ठाण्यातील वागळे इस्टेटमधील किसनगर परिसर हा एकनाथ शिंदेंच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाचा ठरतो. याच भागातून ते प्रथम नगरसेवक झाले. त्यानंतर त्यांचा राजकीय आलेख उत्तरोत्तर वाढत गेला. परंतु किसननगर भागातील रहिवासी, त्यांचे मित्रमंडळी आणि शेजारी यांच्याशी असलेला ऋणानुबंध त्यांनी आजही जपला आहे. त्यामुळे येथील प्रत्येक होळी, दहिहंडी आणि गणेशोत्सवासारख्या सणांना ते आवर्जून उपस्थिती लावतात. येथील कार्यकर्त्यांच्या सुख;दुखाच्या घटनांमध्येही त्यांनी भेट देण्याची सवय सोडली नाही.

लुईसवाडी येथील घरामध्ये स्थलांतरित झाल्यानंतरही त्यांचा किसननगरशी असलेली जवळीक कमी झाली नाही. या भागातून येणाऱ्यांना नावानिशी ओळखून त्यांच्या कामे तात्काळ तडीस लावण्याकडे त्यांचा विशेष कटाक्ष असतो. किसननगर येथील ‘साईराज’ आणि ‘अनुपम’ इमारत दुर्घटनेनंतर येथील जीर्ण इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या घरांचा प्रश्न सोडवण्यासाठी क्लस्टर योजना अंमलात आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे ठाणे महापालिकेकडून राबवण्यात येणाऱ्या क्लस्टर योजनेचा शुभारंभ किसननगर परिसरातून केला जात आहे. या भागातून येणाऱ्या मित्रांनी त्यांना नेहमीच साथ दिली असून त्यांनाही त्यांच्या मैत्रीतून नव्या संधी देण्याचा शिंदे यांनी प्रयत्न केल्याचा दिसतो. नगरसेवक, महापौर, स्थायी समिती सभापती अशी मानाची पदेही आपला साथ देणाऱ्या नगरसेवकांना देऊन किसननगरचा गड बळकट केला आहे. याच ‘किसननगर’मधून मोठे होऊन राज्याचे नेतृत्व करताना एकनाथ शिंदे ठाणे शहराची अधिक भरभराट करतील असा विश्वास त्यांचे लहानपणीचे सवंगडी व्यक्त करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button