breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

मुख्यमंत्रिपद देवेंद्र फडणवीसांकडे; गृह खात्यासाठी रस्सीखेच!

मुंबई : राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अजून सुटलेला नसला, तरी गुरुवारी रात्री ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्यासोबत दिल्लीत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. तथापि, गृह खाते कोणाकडे, यावरून भाजप आणि शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू झालेली आहे. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यातील दरे या आपल्या मूळ गावी तडकाफडकी रवाना झाल्यामुळे, नव्या सरकारचा शपथविधी आणि खातेवाटप यासंबंधी शुक्रवारी होणारी बैठक रद्द करण्यात आली. सोबतच नेता निवडीसाठी भाजप विधिमंडळ पक्षाची होणारी बैठकही लांबणीवर पडली. या घडामोडींमुळे आता नव्या सरकारचा शपथविधी दोनऐवजी पाच डिसेंबरला होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच, जर प्रमुख खात्यांबाबत तोडगा निघाला नाही, तर महायुतीच्या नेत्यांची पुन्हा दिल्लीत स्वतंत्र बैठक होऊ शकते, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

राज्यात महायुतीचे सरकार स्थापन करण्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी राजधानी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. जवळपास दोन तासांच्या या बैठकीत धोरणात्मक निर्णयांवर सहमती घडल्याची माहिती आहे. मुख्यमंत्रिपदावर भाजपचाच उमेदवार असेल. शिवाय, फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, याबाबत बैठकीत स्पष्टता देण्यात आली. अमित शहा यांच्या उपस्थितीतील बैठकीतील धोरणात्मक निर्णयांच्या आधारे महायुतीच्या नेत्यांनी शुक्रवारच्या बैठकीत पुढील निर्णय घेण्याचे ठरले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे मुंबईत परतले. शुक्रवारी दुपारी मुंबईत खातेवाटपासंदर्भात महत्त्वाची बैठक होणार होती. मात्र, ती पुढे ढकलण्यात आली. त्यावरून शिंदे अद्याप नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे, भाजपचा गटनेता निवडल्यानंतरच ही बैठक होईल, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे.

हेही वाचा –  ‘एकनाथ शिंदे, अजित पवार यांचं काम आता झालय’; संजय राऊत

सत्तास्थापनेबाबत महायुतीतील तिढा अजूनही कायम आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे मुंबईत परतले. त्यानंतर शुक्रवारी मुंबईत नव्या सरकारचा शपथविधी आणि खातेवाटपासंदर्भात महत्त्वाची बैठक होणार होती. मात्र, मुख्यमंत्री शिंदे अचानकपणे सातारा जिल्ह्यातील दरे या आपल्या मूळ गावी रवाना झाल्यामुळे आता ही बैठक रद्द झाली आहे.

आपल्याला उपमुख्यमंत्रिपदासोबत गृह खातेही मिळावे, अशी मागणी शिंदे गटाने लावून धरल्याने गृह खात्यावरून महायुतीत रस्सीखेच सुरू झाली आहे. अडीच वर्षांच्या महायुती सरकारच्या काळात गृहमंत्रिपद भाजपला देण्यात आले होते. तोच फॉर्म्युला कायम ठेवण्याचा आग्रह शिंदे गटाकडून धरला जात आहे. तथापि, मुख्यमंत्र्यांकडेच गृह खाते ठेवण्यात येणार असल्याचे भाजपकडून सांगितले जात आहे. फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत हेच धोरण राहिले, याचा दाखला भाजपकडून दिला जात आहे. शिंदे गटाला नगरविकास खात्यासह 8 ते 9 खाती देण्याचा प्रस्ताव देण्यात आल्याचे समजते. मात्र, या फॉर्म्युल्यामुळे मुख्यमंत्री शिंदे नाराज असल्याचे कळते.

महायुतीची मुंबईतील बैठक रद्द झाल्यामुळे ज्या विषयांवर तोडगा निघू शकला नाही, त्यावर नव्याने चर्चा करण्यासाठी पुढील आठवड्यात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांसह दिल्लीत पुन्हा एकदा बैठक घ्यावी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button