तांत्रिक कामे पूर्ण करण्यासाठी उद्या मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक
हार्बर रेल्वेवर अप-डाऊन मार्गावर ब्लॉक,रेल्वेचे वेळापत्रक काय?
मुंबई : असंख्य मुंबईची आणि मुंबईकरांची लाईफलाईन अशी ओळख असणाऱ्या मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या हार्बर आणि मध्य रेल्वेवर उद्या रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. उपनगरीय रेल्वे मार्गावर रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची तांत्रिक कामे पूर्ण करण्यासाठी उद्या मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेवर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.२५ वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. तर हार्बर रेल्वेवर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ वाजेपर्यंत ब्लॉक असेल.
मध्य रेल्वेचे वेळापत्रक काय?
मुंबई उपनगरीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेवरील सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.२५ वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. या ब्लॉकदरम्यान सीएसएमटीहून सुटणाऱ्या धीम्या गाड्या सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर धावतील. तर विद्याविहार ते सीएसएमटी दरम्यान जलद मार्गावर धावणाऱ्या गाड्या धीम्या मार्गावर धावतील. यामुळे विक्रोळी, कंजूरमार्ग, नाहूर, मुलुंड, भांडुप, ठाणे येथील स्थानकांवर गाड्या थांबणार नाहीत.
हार्बर रेल्वेवर अप-डाऊन मार्गावर ब्लॉक
तर हार्बर रेल्वेवर पनवेल-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. यामुळे परिणामी ब्लॉक काळात पनवेल आणि वाशीहून सीएसएमटीला जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील गाड्या बेलापूर मार्गावरून बदलून धावतील. तसेच या मार्गावरील काही गाड्यांची सेवा रद्द करण्यात येईल. तर पश्चिम रेल्वेवर रात्री १२.१५ ते पहाटे ४.१५ पर्यंत मेगाब्लॉक असेल.
पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक
पश्चिम रेल्वेवर मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत ब्लॉक असेल, परिणामी ब्लॉक कालावधीत चर्चगेट आणि माहिम स्थानकांदरम्यान सर्व डाऊन धीम्या मार्गावरील गाड्या डाउन जलद मार्गावर चालवल्या जातील. त्यामुळे या गाड्या महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी, माटुंगा रोड आणि माहिम स्थानकांवर थांबणार नाहीत. पश्चिम रेल्वेवरील महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा रोड या ठिकाणी फ्लाय ओव्हर सस्पेंशनमुळे लोकल थांबणार नाहीत. तर लोअर परळ आणि माहीम स्थानकांवरील फ्लॅटफॉर्मच्या अपुऱ्या लांबीमुळे काही लोकल गाड्या थांबणार नाहीत.