साहित्यिकांनी राजकारणात जरूर यावं, पण साहित्यात राजकारण नको; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis | साताऱ्यात आज ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात सुरू झाले. या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी त्यांनी साहित्य आणि राजकारण यांच्यातील सीमारेषेवर स्पष्ट भूमिका मांडत, “साहित्यिकांनी राजकारणात जरूर यावं, पण साहित्यात राजकारण आणू नये,” अशी विनंती केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, साहित्यसंमेलन दिशादर्शक असतं. अध्यक्षीय भाषणातून पुढच्या वर्षीची दिशा मिळते. अशाच प्रकारचं मार्गदर्शन यातून होत राहील. आम्हाला राजकीय हस्तक्षेप साहित्यात करायचा नाही. आम्हाला रसही नाही. कोणताही राजकीय हस्तक्षेप मी मुख्यमंत्री आहे तोपर्यंत होणार नाही. साहित्यिकांनी राजकारणात जरूर यावं, पण साहित्यात राजकारण आणू नये अशी मी विनंती करतो.
हेही वाचा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मारकाच्या आश्वासनावर अपक्ष अर्ज मागे!
अनेक मराठीच्या सारस्वतांनी या मराठीला फुलवण्याचं काम केलं. आज मला असं वाटतं की जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत आपला मराठीचा अभिमान असाच कायम राहिल. मराठीची सेवा आपण करत राहू. मी निश्चितपणे सांगू इच्छितो की साहित्यिकांचे कार्यच आहे की साहित्याची निर्मिती मनोरंजनाकरता नाहीय, समाजातील जाणिवा विस्तारीत झाल्या पाहिजेत याकरता साहित्याची निर्मिती होत असते. म्हणून कधी टीका झाली, गौरव झाला तरीही त्याचं कोणतंही वाईट वाटून घेण्याऱ्यातले आम्ही नाही. मला असं वाटतं की एखादी टीका झाली, ती योग्य असेल तर त्यातून सुधारण्याचा मार्ग दिसतो. आपल्याला सर्व समजतं अशां मुर्खांच्या नंदनवनात वावरण्यातले आम्ही नक्की नाही. असं कोणी वावरू नये असं समजणारा मी आहे, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
खरं म्हणजे मी मंचावर बसून कधी मोबाईलवर बोलत नाही. पण आज मंचावर बसून मोबाईलवर सतत बोलत होतो, याबाबत मी माफी मागतो. महानगरपालिकेच्या निवडणुकीचा अर्ज परत घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. सगळ्या पक्षांमध्ये एवढी बंडखोरी आहे की त्यांची मनधरणी केल्याशिवाय अर्ज मागे घेत नाहीत. मी कार्यकर्त्यांना विनंती करत होतो की फॉर्म परत घे, त्यामुळे मी फोनवर बोलत होतो. त्याबद्दल मी सर्वांची क्षमा मागतो. मात्र, मी बहुश्रुत आहे, फोनवर बोलतानाही इथे काय बोलणं चाललं होतं याकडे माझं लक्ष होतं, असंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.




