राज्याची आर्थिक स्थिती ‘अडचणीत’, दिवाळखोरीचा धोका नाही; मुख्यमंत्र्यांचा दावा

नागपूर | राज्याची आर्थिक परिस्थिती सध्या आव्हानात्मक असली तरी राज्य दिवाळखोरीकडे जात नाही, असा ठाम दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. अतिवृष्टीबाधित सुमारे ९०लाख म्हणजे ९२ टक्के शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेली मदत मिळाली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. विरोधक अभ्यास न करता निराशेचे वातावरण निर्माण करत आरोप करत असल्याची टीकाही त्यांनी केली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्याला दिवाळखोर दाखविण्याची विरोधकांना घाई झाली आहे, पण प्रत्यक्षात तशी स्थिती नाही. राज्य सरकारकडे खूप पैसे आहेत, असा माझा दावा नाही. मात्र प्रकल्प व योजना पूर्ण करण्यासाठी पैसे आहेत. वित्तीय शिस्तीच्या दृष्टीकोनातून असलेल्या आर्थिक निकषांचे पालन करण्यात येत आहे.
हेही वाचा : राज्याला हुडहुडी, 11 डिसेंबरपर्यंत… हवामान खात्याचा मोठा इशारा; पुणे-मुंबईत काय स्थिती?
अतिवृष्टीबाधितांना मदत व १० हजार रुपये देण्यासाठी पुरेसा दिला असून केवायसीच्या अडचणीमुळे १२ लाख शेतकऱ्यांना मदत मिळाली नव्हती. पण आता त्यातूनही मार्ग काढण्यात आला आहे. शेतकरी कर्जमाफीचा लाभ पात्र शेतकऱ्यांनाच मिळावा, अशी सरकारची भूमिका आहे. त्यासाठीचे धोरण व निकष ठरविण्यासाठी माजी ज्येष्ठ सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. त्यांचा अहवाल आल्यावर सरकार निर्णय घेईल, असे फडणवीस म्हणाले. तसेच, विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय विधानसभा अध्यक्ष व सभापती हेच घेतील. ते घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल, असे फडणवीस यांनी नमूद केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या पुण्यातील वादग्रस्त जमीनप्रकरणाची चौकशी योग्यप्रकारे सुरू आहे. पोलिसांनी प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) नोंदविला आहे, एकाला अटक झाली आहे व तपास सुरू आहे. कोणत्याही चौकशीच्या अहवालाला उच्च न्यायालयात आव्हान दिले जाते. त्यामुळे प्रत्येकाला बाजू मांडण्याची संधी देवून नि:ष्पक्षपणे चौकशी सुरू आहे. अजित पवार हे बहारीनला गेले होते व पुण्यात परतले आहेत. ते रात्री नागपुरात पोचतील. त्यांच्या पत्रकार परिषद येतील अनुपस्थितीवरून चुकीचे अर्थ काढू नये, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. निवडणूक आचारसंहितेमुळे अधिवेशनाचा कालावधी कमी करावा लागला. पण शनिवार-रविवारीही कामकाज केले जाणार असून दररोज किमान १० तास कामकाज होईल आणि विदर्भ व राज्यातील जनतेला न्याय दिला जाईल व विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली जातील, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.





