Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मराठी भाषा कायम अभिजातच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस व अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे उद्‌घाटन

मुंबई | भाषा ही संस्कृती जिवंत ठेवण्याचे माध्यम आहे. देशातील प्रत्येक भाषेने सांस्कृतिक ठेव दिलेली आहे. या सांस्कृतिक उत्थानात भाषेचे महत्त्व असल्याने मातृभाषा आणि इतर भाषांना जिवंत ठेवण्याचा सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. आपली मराठी भाषा ही कालही अभिजात होती, आजही अभिजात आहे, आणि उद्याही अभिजातच राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस व अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधान परिषद सदस्य मनीषा कायंदे, मुख्य पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंग, महाराष्ट्र राज्य विश्वकोष निर्मिती मंडळाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे, विदर्भ साहित्य संघाचे प्रदिप दाते, अभिनेता व निर्माते महेश मांजरेकर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मराठीचा सन्मान हा आपल्या सर्वांचा सन्मान आहे. गावां-घरातून ज्या ओव्या गायल्या, त्या माऊलीचा हा सन्मान आहे. रामप्रहारी येणाऱ्या वासुदेवांचा हा सन्मान आहे. देवळातून गुंजणाऱ्या आरतीचा, भजन-कीर्तनाचा हा सन्मान आहे. संतपरंपरेचा, शाहिरांच्या पोवाड्याचा हा सन्मान आहे. संत ज्ञानेश्वरांच्या भावार्थ दीपिकेपासून ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वचिंतनापर्यंत अशा सर्वच विचारवंतांचा हा सन्मान आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशातल्या एकूण ग्रंथालयांपैकी २५ टक्के ग्रंथालये महाराष्ट्रामध्ये आहेत. साहित्याची गोडी, विविध वैचारिक परंपरा मराठी माणसाने पुढच्या पिढीपर्यंत नेण्याचा प्रयत्न केल्यामुळे मराठी भाषा समृद्ध झाली आहे. सर्वाधिक वाड्:मय कोश हे मराठी भाषेमध्ये असणे ही अभिमानाची गोष्ट आहे. त्याचबरोबर, मराठीमध्ये २०० हून अधिक साहित्य संमेलने प्रतिवर्षी होतात. सर्व प्रकारच्या विचारांना प्रतिपादित करणारी, विविध व्यासपीठे उपलब्ध करून देणारी एकमेव मराठी भाषा असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, डिजिटल युगात कोट्यवधी रुपयांच्या साहित्यविषयक पुस्तकांची विक्री आजही होते. साहित्यासोबतच आज देशामध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये नाटके होतात. मराठी रसिक आणि नाट्यकर्मींनी समृद्ध मराठी रंगभूमी जोपासली असल्याचेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.

हेही वाचा      :        राज्यावर पुन्हा घोंगावतयं संकट! मुंबईसह कोकणाला 7 ऑक्टोबरपर्यंत ‘शक्ती’ चक्रीवादळ धडकण्याची शक्यता

मराठी भाषा जागतिक स्तरावर पोहोचविण्याचे काम महाराष्ट्र शासन करत राहणार : उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत
मराठी ही केवळ भाषा नाही, ती महाराष्ट्राच्या संस्कृतीचा श्वास आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, आणि छत्रपती शिवाजी महाराजांची ही भाषा जागतिक स्तरावर पोहोचवण्याचे काम महाराष्ट्र शासन करत राहणार असल्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले.

ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मराठी भाषा राजकोष या ऐतिहासिक वारशामुळे केंद्र शासनाने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला. तसेच मराठीसोबत प्राकृत भाषेलाही अभिजात दर्जा देऊन महाराष्ट्राचा सन्मान अधिक वृद्धिंगत झाला असल्याचे मंत्री डॉ. सामंत यांनी सांगितले.

डॉ. सामंत म्हणाले की, दिल्लीतील जेएनयूमध्ये मराठी भाषेचे केंद्र स्थापन करून तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारले जाणार आहे. नाशिकजवळील शिरवाडे गाव “पुस्तकाचं गाव” म्हणून विकसित होत आहे. कुसुमाग्रजांच्या नावाने मराठी महोत्सव ग्रामीण भागात आयोजित केला जाणार आहे. लंडनमधील महाराष्ट्र मंडळास स्वत:ची जागा उपलब्ध करून देवून विकत घेऊन तेथे जगातील पहिलं “वैश्विक मराठी भाषा केंद्र” उभारले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी हेमांगी अंक, नवभारत मासिक विशेषांक, रेडिओवर प्रसारित मुलाखतीवरील ‘मराठीचीये कौतुके’ पुस्तक, संदर्भ ग्रंथालयाची माहिती पुस्तिका आणि ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी अभिजात मराठी या ॲपचे प्रकाशन करण्यात आले. त्याचबरोबर अभिजात मराठी दिनानिमित्त भारतीय टपाल विभागामार्फत विशेष टपाल तिकिट आणि आवरणाचे अनावरण करण्यात आले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button