Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर; जनतेला वर्षभर सेवा देण्यासाठी महसूल विभागाने कटिबद्ध राहावे’; पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी : नागरिकांना शासनाच्या सेवा अधिक जलद, पारदर्शक आणि लोकाभिमुख पद्धतीने मिळाव्यात यासाठी राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी महसूल शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून महसूल विभागाशी संबंधित विविध दाखले, प्रमाणपत्रे, फेरफार, वारस नोंदी, जमीन विषयक तक्रारी आणि प्रलंबित अर्जांचा निपटारा एकाच ठिकाणी करण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. शासनाच्या सेवा वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. महसूल विभागाने केवळ अभियानापुरते मर्यादित न राहता वर्षभर नागरिकांना तत्पर सेवा देण्यासाठी कटिबद्ध राहावे, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयेाजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते विविध दाखले व योजनांचा लाभ लाभार्थ्यांना सुपूर्द करण्यात आला. तसेच सिंधुदुर्गनगरीचा ‘आकार बंद’ पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्त करण्यात आला.

पालकमंत्री पुढे म्हणाले की, शासनाच्या विविध सेवा नागरिकांपर्यंत वेळेवर आणि पारदर्शक पद्धतीने पोहोचणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना अनेक सेवा एका ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. नागरिकांना विविध प्रकारचे दाखले वाटप करणारा कार्यक्रम हा समाधान देणारा आहे. प्रशासन पारदर्शक असावे, नागरिकांना फार कमी वेळेत दाखले मिळावे व नागरिक समाधानी होऊन घरी परतावा हा उद्देश समोर ठेऊन समाधान शिबिर सुरू केले आहे. प्रशासनामध्ये आत्मविश्वास वाढविणारे हे शिबिर आहे. दाखला हा नागरिकांच्या जीवनात परिवर्तन आणून विविध लाभ मिळवून देऊ शकतो. मात्र या सेवा केवळ अभियानापुरत्या मर्यादित न ठेवता महसूल विभागाने वर्षभर नागरिकांना तत्पर सेवा देण्यासाठी कटिबद्ध राहावे. प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी करून विश्वासाचे नाते अधिक दृढ करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे. सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात आणि शासनाच्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावा, असे निर्देशही त्यांनी दिले.

हेही वाचा –  उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते ‘अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रा’चे नामकरण

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये मंडळ स्तरावर नियोजित वेळापत्रकानुसार समाधान शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. ७ मार्च पासून आजपर्यंत ४६ मंडळांमध्ये शिबिरांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या माध्यमातून ११ महसूली सेवा नागरिकांना देण्यात आलेल्या आहेत. या शिबिरांमधून विविध प्रकारच्या २० हजार २०१ दाखल्यांचे वाटप करण्यात आलेले आहे.  या शिबिरांमध्ये महसूल विभागासह संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष उपस्थित राहून नागरिकांच्या अर्जांवर तत्काळ कार्यवाही करतात. या अभियानामुळे महसूल प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख होण्यास मोठी मदत होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

प्रास्ताविक करताना उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळूशे यांनी अभियानाची पार्श्वभूमी आणि उद्दिष्टे स्पष्ट केली. या अभियानांतर्गत महसूल विभागासह विविध विभागांच्या सेवांचा लाभ नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार असून फेरफार दाखले, शिधापत्रिका, विविध प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ नागरिकांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी या शिबिरांचा सक्रियपणे लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

या अभियानाच्या माध्यमातून महसूल विभागाशी संबंधित विविध दाखले, प्रमाणपत्रे तसेच प्रलंबित प्रकरणांचा निपटारा एकाच ठिकाणी करण्याची सोय करण्यात आली आहे. मंडळ स्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या या शिबिरांमधून ७/१२ उतारे, फेरफार नोंदी, वारस नोंद, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, जमीन विषयक तक्रारी, विविध महसूल विषयक अर्जांचे निपटारे यासह अनेक सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे नागरिकांना कार्यालयात वारंवार फेरफटका मारण्याची गरज भासणार नसून त्यांच्या समस्या तातडीने मार्गी लागण्यास मदत होणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button