संजय गायकवाडांच्या ‘त्या’ टीकेला छगन भुजबळांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
![Chhagan Bhujbal said that I don't know what I did to Sanjay Gaikwad](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/02/Sanjay-Gaikwad-and-Chhagan-Bhujbal-780x470.jpg)
मुंबई | मराठा आरक्षणाच्या अध्यादेशानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केला होता. यानंतर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. छगन भुजबळांच्या कमरेत लाथ घालून बाहेर काढा, असं संजय गायकवाड यांनी म्हटलं होतं. यावरून, छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, माझा राजीनामा मागण्याचा अधिकार सर्वसामान्य माणसाला आहे. तसा तो आमदारांनाही आहे. त्याबद्दल माझे काहीही म्हणणे नाही. पण संजय गायकवाड यांनी राजीनामा मागताना जी भाषा वापरली, ती बरोबर नाही. संजय गायकवाड शिवसेनेत आहेत. त्यामुळे मी त्यांना सांगू इच्छितो की, तुम्ही ज्या शिवसेनेच्या शैक्षणिक संस्थेत शिकत आहात. त्या संस्थेतील मी वरिष्ठ प्राध्यापक होतो. भाषा जरा जपून वापरायला पाहीजे. त्याबद्दल त्यांचे नेते एकनाथ शिंदे हे पाहतील.
हेही वाचा – छगन भुजबळ भाजपाच्या वाटेवर? अंजली दमानियांचा मोठा दावा
कमरेत लाथ घालून मला बाहेर काढण्याची भाषा वापरली असली तरी मंत्रिमंडळातून बाहेर काढण्याचा किंवा ठेवण्याचा अधिकार सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा आहे. राहिला प्रश्न कमरेत लाथ घालण्याचा तर मला असं वाटतं की ते असं करणार नाहीत. कारण त्यांचे स्व. आनंद दिघे आणि त्यांचे सहकारी आमदार मो. दा. जोशी यांच्याबरोबर मी काम करत होतो. त्यामुळे त्यांनाही कल्पना आहे की, अशी लाथ घालणं किंवा अशाप्रकारची भाषा करणे, हे योग्य नाही, असं छगन भुजबळ म्हणाले.
संजय गायकवाड यांचे मी काय वाकडे केले, हेच मला कळत नाही. मी त्यांना कधी भेटलेलोही नाही. ते त्यांच्या समाजाची मागणी करत आहेत. मी माझ्या ओबीसी वर्गाची मागणी पुढे करत आहेत. यामध्ये त्यांनी वाईट वाटून घेण्याचे काही कारण नाही, असंही छगन भुजबळ म्हणाले.
आमदार संजय गायकवाड काय म्हणाले?
छगन भुजबळ हे मराठा समाजाच्याविरोधात तिरस्काराची भावना ठेवून बोलत आहेत. हे योग्य नाही, अशा मंत्र्याला मंत्रिमंडळात ठेवता कामा नये, त्यांची हकालपट्टी करावी. मंत्रिपद घेताना सर्वांना समान न्याय देण्याची शपथ घेतली जाते, अशावेळी भुजबळ एका समाजाचा तिरस्कार कसा काय करू शकतात? असं संजय गायकवाड म्हणाले.