महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान; म्हणाले..

Chandrashekhar Bawankule | आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. कोणत्या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी द्यायची? याबाबतही खलबतं सुरू आहेत. याबरोबरच महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे. दरम्यान, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असणार? याबाबत मोठं भाष्य केलं आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मला महायुतीमधील तिन्ही नेत्यांचं कौतुक करायचं आहे. काही दिवसांपासून चर्चा आहेत की हा पक्ष १८० जागा लढवणार, तो पक्ष ८० जागा लढवणार, पण आता असं ठरलं आहे की, अशा प्रकारच्या कोणत्याही आकड्यावर जायचं नाही. आता असं ठरलं आहे की, फक्त जिंकण्यासाठी लढायचं आहे. ज्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जिंकेल, त्या ठिकाणी त्यांचा आग्रह आम्ही मान्य करणार, तसेच ज्या जागांवर शिवसेना शिंदे गट जिंकेल त्या जागांवर आम्ही त्यांचा आग्रह मान्य करणार, तसेच ज्या मतदारसंघात भारतीय जनता पार्टी जिंकेल, त्या ठिकाणी आमचा आग्रह शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मान्य करतील. हाच महायुतीचा फॉर्म्युला असणार आहे.
हेही वाचा – मनोज जरांगेंचं मध्यरात्रीपासून उपोषण; राज्य सरकारला इशारा
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आपण ८० ते ९० जागा लढवणार असल्याचं याआधी अनेकदा स्पष्ट केलं आहे. त्यामुळे महायुतीचा फॉर्म्युला नेमकी कसा असणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तसेच महाविकास आघाडीतही जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे.





