अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात दुर्घटनेची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागा मार्फत (सीबीआय) चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली. दादांच्या अपघाती मृत्यूमागचे सत्य समोर आलेच पाहिजे, मात्र दादांचा अपमान होईल, कुटुंबाला त्रास होईल असे कोणीही वागू नये, असा सबूरीचा सल्लाही त्यांनी दिला.
अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूला तीन आठवड्यांचा कालावधी लोटला तरी अजून या अपघातामागील सत्य समोर आलेले नाही. त्याबाबत आमदार रोहित पवार सातत्याने विविध प्रश्न उपस्थित करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना फडणीस यांनी सीबीआय चौकशीची घोषणा केली. राज्य सरकारने या घटनेची राज्य गुन्हा अन्वेषण( सीआडी) मार्फत चौकशी सुरु केली होती. मात्र अजितदादांच्या विमान अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात असल्याने सत्य समोर यावे यासाठी आता सीबीआय मार्फत चौकशीचा निर्णय घेण्यात आला असून तसे विनंती पत्र केंद्र सरकारला पाठविले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी याबाबत चर्चा झाली असून सीबीआय चौकशीतून सत्य समोर येईल असेही फडणवीस यांनी सांगितले.
या अपघाताबाबत ज्यांच्या मनात काही शंका असतील, प्रश्न असतील, त्यांनी ते विमान वाहतूक महासंचालकांकडे (डीजीसीए) किंवा राज्य सरकारकडे पाठवावेत. ते तपास यंत्रणेकडे पाठवून त्याबाबत चौकशी केली जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. डीजीसीए सध्या या प्रकणाची सखोल चौकशी करीत असून त्यातूनही सत्य समोर येईल. मात्र तोवर सर्वांनी संयम ठेवावा, पवार कुटुंबियांना त्रास होईल असे कोणी मागू नये, असे आवाहनही त्यांनी केले. या प्रकरणाचा राज्य सरकार पाठपुरावा करीत असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करीत तसे पत्र आपण मुख्यमंत्र्याना दिल्याचे सांगितले. आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करीत असून दादांच्या बाबतीत काय घडले, हे आम्हालाही जाणून घ्यायचे आहे, असे सांगितले.




