बृजभूषण सिंह यांचा राजीनामा देण्यास नकार; म्हणाले,..
सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय येईल तो मी मान्य करेन
![Brijbhushan Singh said that I will not resign](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/brij-bhushan-singh-780x470.jpg)
दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र तरी देखील कुस्तीपटूंचे आंदोलन सुरूच आहे. दरम्यान, खासदार बृजभूषण सिंह यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.
खासदार बृजभूषण सिंह म्हणाले की, राजीनामा ही मोठी गोष्ट नाही पण मी गुन्हेगार नाही. मी राजीनामा दिला तर त्याचा अर्थ असा होईल की मी त्यांचे (कुस्तीगीरांचे) आरोप मान्य केले आहेत. माझा कार्यकाळ जवळपास संपत आला आहे. सरकारने ३ सदस्यीय समिती स्थापन केली असून ४५ दिवसांत निवडणुका होणार असून निवडणुकीनंतर माझा कार्यकाळ संपणार आहे.
आता कुस्तीपटू दर दिवशी नवी मागणी समोर आणत आहेत. त्यांनी एफआयआरची मागणी केली त्यानंतर आता मला तुरूंगात पाठवावं आणि सर्व पदांचा राजीनामा द्यावा अशी मागणी करतायत. मी माझ्या मतदारसंघात लोकांमुळे खासदार आहे. विनेश फोगाटमुळे खासदार नाही झालोय. फक्त एका कुटुंबातील सदस्य आणि त्यांच्या आखाडा माझा विरोध करतोय. हरयाणातील ९० टक्के खेळाडू माझ्यासोबत आहेत. त्यांनी १२ वर्षांपासून कोणत्याही पोलिस स्टेशनला, क्रीडा मंत्रालयाकडे किंवा महासंघाकडे तक्रार नाही केली. विरोध करण्याआधी माझं कौतुक करायचे, मला लग्नातही बोलवत होते आणि फोटोही सोबत काढायचे. आता प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आणि दिल्ली पोलिसांकडे आहे. मी जो निर्णय येईल तो मान्य करेन, असं बृजभूषण सिंह यांनी म्हटलं आहे.