कोकण शिक्षक मतदारसंघात भाजप-शिंदे गटाने खातं उघडलं, मविआला मोठा धक्का
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/Balaram-Patil-780x470.jpg)
- महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय
ठाणे : कोकण शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील यांचा पराभव करत भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विजयश्री खेचून आणली आहे. म्हात्रे यांना पहिल्या पसंतीची जवळपास २० हजार मते मिळाली आहेत. म्हात्रे यांच्या विजयासह भाजप आणि शिंदे गटाने विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला पहिला धक्का दिला आहे.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात झालेल्या निवडणुकांचे आज निकाल जाहीर होत आहेत. एकूण पाच जागांवर झालेल्या निवडणुकीसाठी आज मतमोजणी सुरू असून पहिला निकाल हा कोकण शिक्षक मतदारसंघातून आला. ज्ञानेश्वर म्हात्रे हे पूर्ण तयारीने प्रचारात भाग घेताना दिसले होते. भाजपच्या म्हात्रे यांना शिंदे गटानेही सक्रिय पाठिंबा दिला होता. तर दुसरीकडे शेकापचे बाळाराम पाटील हे महाविकास आघाडीतील घटकपक्षांच्या मदतीने म्हात्रे यांना आव्हान देत होते. मात्र अखेर आज या जागेचा निकाल स्पष्ट झाला असून बाळाराम पाटील यांच्या पदरी निराशा पडली आहे.
‘शिक्षकांनी दिलेला कौल मान्य’
कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक निकालाची घोषणा होताच बाळाराम पाटील यांनी आपला पराभव मान्य केला. निवडणूक काळात अनेक चुकीच्या गोष्टी घडल्या होत्या. मात्र आजच्या दिवशी मी त्यावर न बोलता कोकणातील शिक्षकांनी दिलेला कौल मान्य करतो, अशी प्रतक्रिया पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ, अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ, नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ, मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल येणं अद्याप बाकी आहे.