गवळीनगर-चक्रपाणी वसाहतमध्ये भाजपा अन् राष्ट्रवादीचाही ‘क्लिन स्विप’चा दावा!
ग्राऊंड रिपोर्ट: प्रभाग क्रमांक ५ मध्ये भाजपा-राष्ट्रवादीमध्ये अतितटीची लढाई
पिंपरी-चिंचवड । अविनाश आदक । पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 ची प्रारुप प्रभाग रचना जाहीर झाली. ऑक्टोबरमध्ये हरकती आणि सूचनांची सुनावणी होईल आणि सदरची प्रभाग रचना अंतिम केली जाणार आहे. त्यानंतर आरक्षण सोडत आणि निवडणूक आचारसंहिता सुरू होईल. ही निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडीतील घटकपक्ष स्वबळावर लढवतील, असे चित्र आहे. डिसेंबरमध्ये मतदान आणि जानेवारी-2026 मध्ये महानगरपालिकेत नवीन महापौर विराजमान होतील. या निमित्ताने ‘‘महाईन्यूज’’ च्या माध्यमातून प्रभागनिहाय राजकीय स्थितीबाबत विश्लेषण पहिला ‘‘ग्राऊंड रिपोर्ट’’ प्रसिद्ध करीत आहोत.
2017 च्या निवडणुकीप्रमाणे प्रभाग ‘‘रचना जैसे थे’’ आहे. प्रभाग क्रमांक 5 मध्ये कोणताही बदल नाही. ज्याअर्थी 2017 प्रमाणे प्रभाग निश्चित झाले आहेत. त्यासाठी 2011 ची जनगनना ग्रहीत धरण्यात आली आहे. तत्कालीन जनगननेनुसार, प्रभागाची लोकसंख्या 49 हजार 539 इतकी दर्शवण्यात आली आहे. त्यापैकी 5 हजार 437 इतकी अनुसूचित जाती आणि 1 हजार 214 इतकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे.
लोकसंख्येच्या प्रमाणानुसार, 2017 मध्ये या प्रभागामध्ये भाजपाची मोठी लाट होती. मात्र, या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 2 आणि भाजपाचे 2 नगरसेवक निवडून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील अजित गव्हाणे यांचा प्रभाव असलेला हा प्रभाग म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी भाजपाचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांचे बंधू कामगार नेते सचिन लांडगे यांनी गव्हाणे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. अत्यंत प्रतिष्ठेच्या या लढाईमध्ये अजित गव्हाणे यांना 10 हजार 58 मते मिळाली आणि सचिन लांडगे यांना 9 हजार 722 मते मिळाली आहेत. अवघ्या 336 मतांनी सचिन लांडगे यांचा पराभव झाला होता.
आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक सागर गवळी यांनी अ- गटातून 10 हजार 610 मते मिळवत, राष्ट्रवादीच्या वसंत लोंढे यांचा पराभव केला होता, तर ब- गटातून राष्ट्रवादीच्या अनुराधा गोफणे यांनी 9 हजार 202 मते मिळवत भाजपाच्या सुलोचना भोवरे यांचा पराभव केला होता. क- गटातून भाजपा प्रियांका बारसे यांनी 9 हजार 361 मते मिळवत विजय मिळवला. त्यांनी राष्ट्रवादीच्या कोमल फुगे यांचा पराभव केला होता. ऐकेकाळी आमदार महेश लांडगे यांच्या समर्थक असलेल्या बारसे यांनी 2022 च्या महापालिका निवडणुकीपूर्वी एकत्रित राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर सध्या त्या राष्ट्रवादी शरद पवार गटात आहेत.
दरम्यान, विधानसभा निवडणूक 2024 मध्ये अजित गव्हाणे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी ‘तुतारी’ चिन्हावर निवडणूक लढवली. या निवडणुकीत महेश लांडगे यांनी विधानसभा विजयाची ‘हॅट्ट्रिक’ केली. गव्हाणे यांच्या ‘होमपीच’वर महेश लांडगे यांनी 4 हजार 200 हून अधिक मते घेतली आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत हा प्रभाग अत्यंत संवेदनशील आणि प्रतिष्ठेचा म्हणून लक्षवेधी ठरणार आहे.
2017 च्या आरक्षणानुसार, अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब- सर्वसाधारण महिला, क- सर्वसाधारण महिला आणि ड- सर्वसाधारण असे आरक्षण होते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला 50 टक्के आरक्षण आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, ओबीसी आरक्षण पूर्ववत ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आरक्षणामध्ये काही फार बदल होईल, असे चित्र नाही.
गेल्या 8 वर्षांत ‘गाऊंड लेव्हल’वर काम केले आहे. 20 लाख लीटर क्षमतेच्या नवीन पाण्याच्या टाक्या, वाहनतळ, भोसरी-दिघी शिव रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. पायाभूत सोयी-सुविधा सक्षम करण्यावर भर दिला आहे. आमचा लोकांशी संपर्क चांगला आहे. प्रभागात विधानसभा निवडणुकीतील मताधिक्य पाहता भाजपाचे चारही नगरसेवक निवडून येतील.
– सागर गवळी, भाजपा.
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वात विकासाला गती देण्यात आली. आम्ही प्रस्थापितांविरोधात लढा उभा केला. प्रभागातीलच नव्हे, तर मतदार संघातील नागरिक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठिशी राहतील. विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत अनेकांनी साशंकता व्यक्त केली आहे. महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विचाराचे चारही नगरसेवक निश्चितपणे निवडून येतील.
– अजित गव्हाणे, राष्ट्रवादी अ.प.







