मोठी बातमी : पिंपरी-चिंचवडमधील भाजपाचे अमित गाेरखे यांना विधान परिषदेवर संधी!
प्रदेश भाजपाकडून केंद्राकडे प्रस्ताव पाठवल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/Amit-Gorkhe-1-780x470.jpg)
पुणे । प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकांचे निकाल लागताच राज्यात विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. जुलै महिन्यात विधानपरिषदेच्या (Vidhan Paridhad Election 2024) 11 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत महायुतीकडून (Mahayuti) कोणाला संधी दिली जाणार? याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून विधानपरिषदेसाठी काही नावांचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आहे. त्यामध्ये लोकशाहीर आण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि भाजपा पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांचा समावेश आहे., अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून विधानपरिषदेसाठी नावांचा केंद्राकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्यामध्ये माजी मंत्री पंकजा मुंडे, अमित गोरखे, परिणय फुके, सुधाकर कोहळे, योगेश टिळेकर, निलय नाईक, हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे, चित्रा वाघ, माधवी नाईक यांचा समावेश आहे.
अमित गोरखे यांना संधी मिळाल्यास पिंपरी-चिंचवडमध्ये भारतीय जनता पार्टीला फायदा होणार आहे. शहरातील अल्पसंख्याक समाजातील नवीन आणि उमदे नेतृत्व म्हणून गोरखे यांच्याकडे पाहिले जाते. विशेष म्हणजे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील कार्यकर्ता म्हणून त्यांची प्रदेशपातळीवर ओळख आहे.
पिंपरी-चिंचवडमधील पिंपरी विधानसभा अनुसूचित जागांसाठी राखीव आहे. तसेच, शहरात अल्पसंख्याक नागरिकांचे प्रमाणही निर्णायक आहे. विशेष म्हणजे, आरपीआयचे नेते व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना मानणारा मोठा मतदार वर्ग शहरात आहे. त्यामुळे आरपीआयच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे यांचीही वर्णी विधान परिषदेवर लागेल, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.
विधानपरिषद निवडणुकीचं गणित काय?
जुलैमध्ये राज्यात 11 जागांसाठी विधानपरिषदेची निवडणूक पार पडणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी जुळवाजुळव सुरू केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये विधान परिषद निवडणुकीवरुन जोरदार खलबतं सुरू झाली आहेत. 11 जागांपैकी तीन जागा महाविकास आघाडीला मिळतील, असा ठाम विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. याबाबत आपलं गणित पक्कं असल्याचं सांगून त्यांनी महायुतीचे आमदार फुटणार असल्याचं सूचक वक्तव्यही केलं आहे.
कुणाकडे किती संख्याबळ ?
महायुती : भाजप : 103 + शिंदे सेना : 37 + राष्ट्रवादी (AP) : 39 + छोटे पक्ष : 9 + अपक्ष : 13 = एकूण : 201
महाविकास आघाडी : काँग्रेस : 37 + ठाकरे गट : 15 + राष्ट्रवादी (SP) : 13 + शेकाप : 1 + अपक्ष : 1 = एकूण : 67
एमआयएम : 2 । सपा : 2 । माकप : 1॥ क्रां. शे. प. : 1 = एकूण : 6 आमदार तटस्थ