सनव्ह्यूह सोसायटी परिसरातील संभाव्य अपघाताचा धोका टळला!
नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य : माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर यांचा पुढाकार

पिंपरी- चिंचवड । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रभाग क्रमांक ९ मधील उद्यमनगर येथील सनव्ह्यूह सोसायटी परिसरात झाडांच्या सुकलेल्या व धोकादायक फांद्या लोंबकळत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या फांद्या कोणत्याही क्षणी कोसळून मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या गंभीर समस्येची तातडीने दखल घेत माजी महापौर तथा प्रभाग क्रमांक ९ च्या माजी नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर-लोंढे यांनी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
डॉ. घोडेकर-लोंढे यांच्या पाठपुराव्यानंतर संबंधित अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या उपस्थितीत धोकादायक व सुकलेल्या फांद्या सुरक्षितरीत्या हटविण्यात आल्या. तसेच भविष्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी झाडांच्या आवश्यक त्या फांद्यांची छाटणी करण्यात आली. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
हेही वाचा – शरद पवारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; सत्तेत सहभागी होणार? नेमकी काय झाली चर्चा?

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये झाडांच्या फांद्या कोसळण्याच्या घटना घडत आहेत. अशा परिस्थितीत उद्यमनगर परिसरातील नागरिकांनी ही समस्या निदर्शनास आणून दिल्यानंतर डॉ. वैशाली घोडेकर-लोंढे यांनी कोणताही विलंब न लावता प्रशासनाला सतर्क केले. त्यांच्या तत्परतेमुळे संभाव्य अपघाताचा धोका टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
डॉ. वैशाली घोडेकर-लोंढे या नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत असून, पावसाळ्यात नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्या बाबींकडे दुर्लक्ष न करता अशा तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी त्या सातत्याने प्रशासनाशी समन्वय साधत आहेत.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“नागरिकांची सुरक्षितता हीच आमची सर्वोच्च जबाबदारी आहे. पावसाळ्याच्या काळात झाडांच्या धोकादायक फांद्या कोसळून अपघात होण्याची शक्यता अधिक असते. उद्यमनगर परिसरातील नागरिकांनी ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कार्यवाही करण्यात आली. भविष्यातही नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित कोणतीही समस्या निर्माण झाल्यास त्यावर तत्काळ उपाययोजना करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
– वैशाली घोडेकर- लोंढे, माजी महापौर.





