‘अमित शाह, योगींनी कोकणात येऊ नये, अन्यथा..’; ठाकरे गटातील नेत्याचा इशारा

मुंबई | रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून भाजपाने नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची कोकणात प्रचारसभा होणार आहे. मात्र, यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी भाजपला इशारा दिला आहे. अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात येऊ नये, अन्यथा येथील जनता त्यांना पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही, असं ते म्हणाले.
भास्कर जाधव म्हणाले की, खाशाबा जाधव एवढेसे होते. त्यांच्यासमोर भलेमोठे परदेशी पैलवान होते. मात्र, त्यांनी या पैलवांनाना पराभूत करून सुवर्णपदक मिळवलं. आमचे विनायक राऊतही तसेच आहेत. मी आज अमित शाह आणि योगी आदित्यनाथ यांना सांगतो की तुम्ही कोकणात येण्याच्या भानगडीत पडू नका. इथे आलात तर कोकणातील जनता तुम्हाला कोकणच्या मातीचं पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
हेही वाचा – ‘लखनऊमध्ये कुणाची तरी २०० एकर जमीन जप्त, योग्यवेळी बोलणार’; मुख्यमंत्री शिंदेंचा रोख कुणाकडे?
दरम्यान, भाजपाचे उमेदवार नारायण राणे यांच्याविरोधात ठाकरे गटाने राणेंचे कट्टर विरोधक असलेल्या विनायक राऊत यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कोकणातील राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. विनायक राऊत यांनी या मतदारसंघातून दोन वेळा निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे यंदा ते विजयाची हॅट्रिक करणार का? हे पाहणं महत्वाचं आहे.