‘ब्रम्हदेव खाली आले तरी २०२४ पर्यंत मंत्रिपद घेणार नाही’; बच्चू कडू यांचं विधान
![Bacchu Kadu said that even if Brahmadev comes down, he will not take the post of minister till 2024](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/Bacchu-Kadu-4-780x470.jpg)
मुंबई : अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासह ८ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यामुळे शिंदे गट आणि भाजपमधील आमदार नाराज असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मंत्रीपदाबाबत मोठं विधान केलं आहे.
बच्चू कडू म्हणाले, मंत्री पदापेक्षा मला मंत्रालय भेटलं. दिव्यांगण मंत्रालय भेटले, मंत्रिपदापेक्षा जास्त भेटलं. आम्ही मागितलेला एक डोळा आणि आम्हाला मिळाले दोन डोळे. मला मंत्रीपदाची गरज नाही. मी दावा सोडलेला आहे. २०२४ पर्यंत ब्रह्मदेव खाली आला तरी मी मंत्रिपद घेणार नाही.
अजित पवार यांनी कारखान्यांवर घातलेल्या अटी देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केल्या. यावरून ते म्हणाले, एकत्रित सरकार आहे. काही गोष्टी एकत्रित नसताना घेतलेले निर्णय आणि आता एकत्रित आल्यावर घेतलेले निर्णय, त्याच्यातला हा निर्णय आहे.
हेही वाचा – चीनचा उल्लेख करत राहुल गांधींची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका; म्हणाले..
तलाठी भरतीच्या पेपर फुटीचे प्रकार उघडकीस येत आहेत. यावरून ते म्हणाले, स्पर्धा परीक्षेबाबत पेपर फुटीचा कायदा झाला पाहिजे. शेतीला भाव नाही. शेतकऱ्याच्या मुलाला वावही नसेल, त्यात पेपर फुटी होत असेल तर कडक कायदा करण्याची आवश्यकता आहे. या प्रकरणात सरकार बदनाम होतं. पेपर फुटीचा कायदा इतका कडक झाला पाहिजेल की मृत्यू दंड होतो, त्याप्रमाणे त्याच्यावर दंड झाला पाहिजे. चाकूने मारलेला माणूस दिसतो. मात्र परीक्षेने मारलेला माणूस दिसत नाही.
ज्याला ५० टक्के गुण घेण्याची लायकी नसते तो पास होतो आणि ९९ टक्के घेणारा नापास होतो. त्यामुळे हा मोठा खूनच आहे. त्याला त्याच पद्धतीने शिक्षा झाली पाहिजे. भ्रष्टाचार मुक्त होणे गरजेचे आहे. आरोग्य, शिक्षण, परीक्षा भरती याचा ताळमेळ राखला पाहिजे, असंही बच्चू कडू म्हणाले.