Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘एमटीडीसी’मार्फत लोणार येथे २४ एप्रिल पासून ‘खगोल दर्शन महोत्सव’; मंत्री शंभूराज देसाई

मुंबई : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त, आंतरराष्ट्रीय डार्क स्काय सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर, २४ ते २६ एप्रिल २०२६ दरम्यान एमटीडीसी लोणार, जि. बुलढाणा येथे पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन, तर्फे ‘खगोल दर्शन महोत्सव २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. लोणार हे जगप्रसिद्ध उल्कापातामुळे निर्माण झालेले अद्वितीय सरोवर असून ‘डार्क स्काय’ संवर्धनासाठी अत्यंत अनुकूल ठिकाण मानले जाते. या खगोल दर्शन महोत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.

हा महोत्सव आंतरराष्ट्रीय ‘डार्क स्काय वीक’च्या निमित्ताने आयोजित करण्यात आला असून महोत्सवादरम्यान  स्टारगेझिंग (आकाश निरीक्षण), तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि विज्ञानाधारित विविध उपक्रमांचा समावेश असणार आहे. त्याच बरोबर  नागरिकांना आकाश निरीक्षणाचा एक अनोखा व संस्मरणीय अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी), ॲस्ट्रॉनइरा आणि डार्क स्काय इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. तसेच ॲस्ट्रॉनइराच्या संस्थापिका व संचालिका श्वेता कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून स्टारगेझिंग (आकाश निरीक्षण) सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

लोणार परिसरात प्रकाश प्रदूषण कमी ठेवल्यास वैज्ञानिक संशोधनास चालना मिळण्याबरोबरच नैसर्गिक पर्यावरणाचा समतोल राखण्यास मोठी मदत होईल. त्यामुळे हा उपक्रम केवळ खगोलशास्त्रापुरता मर्यादित नसून पर्यावरण संवर्धनाशीही निगडित आहे. विज्ञान, पर्यावरण आणि पर्यटन यांची सांगड घालणारा हा उपक्रम लोणारच्या शाश्वत पर्यटन विकासाला नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा –  राज्य सरकारचे चार धडाकेबाज निर्णय, साताऱ्यात आयटी पार्कसाठी जमीन मंजूर, बायोगॅस प्रकल्पांसाठी 500 कोटींचा निधी

महोत्सवादरम्यान लोणार येथे स्टारगेझिंग (आकाश निरीक्षण) सत्रांसोबतच प्रदर्शने आणि माहितीपटांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये प्रकाश प्रदूषणाचे दुष्परिणाम, नैसर्गिक अंधाराचे महत्त्व तसेच वैयक्तिक व सामाजिक पातळीवरील उपाययोजनांविषयी सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. विज्ञान प्रसार व निसर्ग संवर्धन यांची सांगड घालत ‘ॲस्ट्रोटुरिझम’या शाश्वत पर्यटन क्षेत्राच्या विकासालाही यामुळे गती मिळणार आहे.

लोणारचा व्यापक प्रचार व प्रसिद्धी होऊन देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी लोणारला पसंती द्यावी, या उद्देशाने येथे विविध पर्यटन मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यामध्ये एमटीडीसी पर्यटक निवास, पर्यटक अभ्यागत केंद्र यांसह तारांगण, प्रयोगशाळा, योग केंद्र तसेच नवीन एमटीडीसी पर्यटक निवासाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. त्या अनुषंगाने लोणार येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त हा उपक्रम विशेषरित्या आयोजित करण्यात येत असून पर्यावरणपूरक व अनुभवाधारित पर्यटनाला चालना देणे हा यामागील प्रमुख उद्देश आहे, असे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश  गटणे यांनी सांगितले.

‘खगोल दर्शन महोत्सव २०२६’च्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पर्यटन विभागाचे उपसचिव संतोष रोकडे, महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, विभाग प्रमुख मानसी ताटके, प्रादेशिक व्यवस्थापक, छत्रपती संभाजीनगर योगेश निरगुडे, तसेच लोणारचे पर्यटक निवास व्यवस्थापक सदानंद दाभाडे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button