अजितदादांच्या स्वप्नपूर्तीतून चिमुकल्यांची ऐतिहासिक श्रद्धांजली; पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे ३४८ विद्यार्थी राज्य पुरस्काराचे मानकरी
राज्यात सर्वाधिक पुरस्कार मिळवत मोडला गतवर्षीचा उच्चांक; ३० शाळांमधील विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

पौड : महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईड, मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय राज्यपुरस्कार चाचणी शिबिराचा निकाल नुकताच जाहीर झाला. या निकालात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या (PDEA) तब्बल ३४८ विद्यार्थ्यांनी बाजी मारत राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रात एक नवा इतिहास रचला आहे. संस्थेच्या या यशाने गतवर्षीचा स्वतःचाच उच्चांक मोडीत काढला असून, राज्यामध्ये सर्वाधिक पुरस्कार मिळविणारी संस्था म्हणून मान मिळवला आहे. मात्र, या यशाचा आनंद साजरा करण्याऐवजी विद्यार्थ्यांनी हे यश संस्थेचे दिवंगत अध्यक्ष अजित पवार यांना समर्पित करून एक अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे.
विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास व्हावा, यासाठी अजित पवार यांनी संस्थेच्या प्रत्येक शाखेत स्काऊट-गाईड उपक्रम राबवण्याचे आदेश दिले होते. त्यांच्याच प्रेरणेतून संस्थेच्या ३० शाळांमधील १५० मुले (स्काऊट) आणि १९८ मुली (गाईड) अशा एकूण ३४८ विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश संपादन केले. या विद्यार्थ्यांना १० वीच्या परीक्षेत वाढीव ३ गुणांचा लाभ मिळणार आहे.
हेही वाचा – ११ व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे सुवर्ण कैलास पारितोषिक परज्या चित्रपटास प्रदान
यशाचा प्रवास आणि चाचणी शिबिर
या परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने विशेष चाचणी शिबिरे घेण्यात आली होती. त्यानंतर १६ ते २३ जानेवारी दरम्यान भोर येथे झालेल्या राज्यस्तरीय चाचणी शिबिरात या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. मुळशी, बारामती, जुन्नर, इंदापूर, पुरंदर, खेड, दौंड, शिरूर, मावळ आणि हवेली अशा विविध तालुक्यातील संस्थेच्या शाळांनी या यशात आपला वाटा उचलला आहे.
शाबासकीची थाप द्यायला दादा हवे होते…
निकालाचे वृत्त समजताच संस्थेच्या वर्तुळात आनंदाचे वातावरण पसरले असले तरी, मार्गदर्शक आणि विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत पाणी होते. “हे यश पाहण्यासाठी आणि आमच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी आज दादा हवे होते,” अशी भावना शिक्षकांनी व्यक्त केली.
या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव ए. एम. जाधव यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
”संस्थेचे अध्यक्ष स्वर्गीय अजितदादा पवार साहेब विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर नेहमीच भर देत असत. त्यांच्या मार्गदर्शन व प्रेरणेतूनच हे यश मिळाले आहे. मात्र, निकाल ऐकण्यासाठी ते आज आपल्यात नाहीत, याचे मोठे दुःख आहे.”
— शारदा अशोक मदने (उपशिक्षिका, श्री शहाजी विद्यालय, सुपे)
”संस्थेचे अध्यक्ष स्वर्गीय अजितदादा पवार साहेब नेहमी म्हणायचे की, ग्रामीण भागातील विद्यार्थी केवळ पुस्तकी ज्ञानातच नव्हे, तर शिस्त आणि शारीरिक क्षमतेतही अव्वल असायला हवा. त्यांच्या याच ‘व्हिजन’मुळे आम्ही प्रत्येक शाखेत स्काऊट-गाईड सक्तीचे आणि प्रभावी केले. आज ३४८ विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश दादांच्या दूरदृष्टीचा विजय आहे. हे यश आम्ही त्यांना अत्यंत नम्रपणे समर्पित करतो.”
— राजेंद्र घाडगे (उपाध्यक्ष, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ)
”राज्यात सर्वाधिक पुरस्कार मिळवणे हे केवळ योगायोगाने घडलेले नाही, तर त्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत आणि संस्थेने केलेले काटेकोर नियोजन कारणीभूत आहे. दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रत्येक शिक्षकाचे प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सराव शिबिरांकडे वैयक्तिक लक्ष दिले होते. आज मिळालेला हा ऐतिहासिक निकाल म्हणजे दादांना वाहिलेली कृतीशील श्रद्धांजली आहे.”
— ॲड. संदीप कदम (मानद सचिव, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ) *




