‘नारायण राणे वैचारिक उंचीप्रमाणे बोलले, त्यामुळे..’; अरविंद सावंत यांची खोचक टीका
![Arvind Sawant said that Narayan Rane spoke like an ideological height in the Lok Sabha](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/narayan-rane-and-arvind-sawant-780x470.jpg)
मुंबई : मोदी सरकारविरोधात लोकसभेत अविश्वास ठरावावर चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेच्या पहिल्याच दिवशी शिंदे गटेचे खासदार श्रीकांत शिंदे आणि ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिंदे गटाची बाजू घेत ठाकरे गटातील खासदारांना इशारा दिला. याला खासदार अरविंद सावंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
अरविंद सावंत म्हणाले की, काहींनी आपल्या मर्यादा ओळखल्या पाहिजेत. हिंदुत्वावर भाष्य करणाऱ्यांचा जन्म केव्हा झाला? हिंदुत्वात पळपुटे असू शकत नाहीत. पळपुटे म्हणल्यावर एवढी मिर्ची झोंबली की सर्वजण उठले. तुमच्याक हिंमत होती, तर समोर येऊन बोलायचं होतं. पण, हिंमत नसलेली ही माणसे आहेत.
हेही वाचा – अविश्वास ठरावादरम्यान राहुल गांधींना आंबेडकरांचे 7 प्रश्न
माझे भाषण संपल्यावर नारायण राणे उभे राहिले. त्यांनी म्हटलं, हा कधी शिवसेनेत आला. राणेंनी त्यांच्या आणि माझ्या जन्माची तारीख पाहून घ्यावी. मी जन्मापासून शिवसेनेत आहे. १९६८ साली मी शिवसेनेचा गटप्रमुख होतो. तुम्ही शिवसेना सोडली, तुमचा स्वाभिमान पक्ष लाचार झाला. नंतर तुम्ही काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपात प्रवेश केल्यावरही तुमचा मुलगा काँग्रेसमध्येच होता. कुठलीही निती नसलेल्या माणसांनी बोलल्यावर आम्ही ऐकून घेणार नाही, असं अरविंद सावंत म्हणाले.
लोकसभेत नारायण राणे वैचारिक उंचीप्रमाणे बोलले. त्यामुळे लायकी वगैरे शब्द काढले. आपण कोण आहोत आणि कोणत्या स्थानावर बसलोय, हे काहींना कळत नाही, असंही अरविंद सावंत म्हणाले.