सोलापूर दक्षिणच्या जागेवरून ‘मविआ’त बिघाडी? संजय राऊत-नाना पटोले यांच्यात पुन्हा खडाजंगी!
![Another fight between Sanjay Raut and Nana Patole](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/10/Sanjay-Raut-and-Nana-Patole-780x470.jpg)
Sanjay Raut and Nana Patole | महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि काँग्रेसकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र, दक्षिण सोलापूरमधून दोन्ही पक्षांनी उमेदवार जाहीर केल्याने वाद निर्माण झाला आहे. सोलापूर दक्षिणसाठी शिवसेना (ठाकरे गट) पक्षाने अमर पाटील यांना उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीत सोलापूर दक्षिणमधून दिलीप माने यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे आता सोलापूर दक्षिणच्या जागेबाबत शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद निर्माण झाला आहे.
यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला इशारा दिला आहे. ते म्हणाले, शिवसेना ठाकरे गटासह आमच्या मित्रपक्षाचेही समाधन होईल, अशा प्रकारे जागावाटप होईल. मात्र, फॉर्म्युल्यासंदर्भात ज्या वेगळ्या काही बातम्या येत आहेत. त्यामध्ये काही तथ्य नाही. आम्ही सर्वजण एकत्र लढत आहोत. मात्र, आम्हाला पाहायला मिळालं की, सोलापूर दक्षिण मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाने उमेदवार दिला. त्या मतदारसंघात काँग्रेसच्या यादीत उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. पण मी असं मानतो की, ही टायपिंग मिस्टेक असेल. पण अशा टायपिंग मिस्टेक आमच्याकडूनही होऊ शकतात, असं संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा – ‘महायुतीने आमचा विचार केला नाही’; रामदास आठवलेंनी व्यक्त केली नाराजी
सोलापूर दक्षिणच्या कथित टायपिंग मिस्टेकबाबत नाना पटोले म्हणाले, की कोकणात आम्हालाही जागा मिळाली नाही. संजय राऊतांनी हा विषय संपवला पाहिजे. विरोधकांच्या विरोधात आपल्याला लढायचं आहे. मला असं वाटतं की संजय राऊतांनी आपली भूमिका विरोधकांच्या विरोधात टाकली पाहिजे असा प्रेमाचा सल्ला आहे. आमच्या हायकमांडने घेतलेला निर्णय आहे. त्या पातळीवर ती चर्चा होईल. असं मला वाटतं, राज्य म्हणून प्रतिक्रिया देणार आहे.
दरम्यान, काँग्रेसने दक्षिण सोलापूरमधून उमेदवारी जाहीर केली. तसंच, अंधेरी पश्चिममधील उमेदवार काँग्रेसने एका दिवसांत बदलला. आधीच्या यादीत या जागेवरून सचिन सावंत यांना उमेदवारी देण्यात आली होती. परंतु, ते वांद्रे पूर्वसाठी इच्छूक होते. सचिन सावंत यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर त्यांची अंधेरी पश्चिमची जागा अशोक जाधव यांना देण्यात आली.