‘पंकजा मुंडे यांनी आता विचार करावा आणि योग्य निर्णय घ्यावा’; राष्ट्रवादीच्या नेत्याचा सल्ला

मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याला जीएसटी आयुक्तलयाने नोटीस बजावली आहे. पंकजा मुंडे या भाजपाच्या नेत्या आहेत तरी देखील त्यांच्या साखर कारखान्याला नोटीस बजावल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी पंकजा मुंडे यांना एक महत्वाचा सल्ला दिला आहे.
अनिल देशमुख म्हणाले, पंकजा मुंडे यांच्यावर त्यांचाच पक्ष अन्याय करतो आहे. भाजपाला मोठं करण्याचं काम गोपीनाथ मुंडे यांनी केलं. मात्र त्यांच्याच कन्येवर पक्ष अन्याय करतो आहे ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. पंकजा मुंडे यांनी आता योग्य तो विचार करावा आणि योग्य निर्णय घ्यावा.
हेही वाचा – Ganesh Utsav 2023 : शारदा गणेशाचा इतिहास तुम्हाला माहीत आहे का?
अनिल देशमुख यांना शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीवरही प्रतिक्रिया दिली आहे. आमदार अपात्रतेचा मुद्दा साधा सरळ आहे तरीही तारीख पे तारीख दिली जात आहे. न्याय द्यायचा नसेल तर असा वेळकाढूपणा केला जातो असंही त्यांनी म्हटलं आहे. विधानसभा अध्यक्षांनी लाईव्ह सुनावणी घ्यावी ही विजय वडेट्टीवार यांनी केलेली मागणी योग्यच आहे असं अनिल देशमुख म्हणाले.





