जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून अमोल मिटकरींचा हल्लाबोल; म्हणाले..
![Amol Mitkari scolded Jitendra Awada over Sharad Pawar's photo](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/amol-mitkari-and-jitendra-awhad-780x470.jpg)
मुंबई : अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचा फोटो वापरण्यावरून शाब्दित हल्लाबोल सुरू आहे. अजित पवार यांच्या समर्थकांकडून शरद पवारांचे फोटो वापरण्यात येत आहेत. आपला फोटो वापरणाऱ्यांना शरद पवारांनीही इशारा दिला आहे. दरम्यान, यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात चांगलीच झुंपली आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी शरद पवार यांचा फोटो वापरला होता. यावरून जितेंद्र आव्हाड म्हणाले की, जिवंत माणूस जेव्हा सांगतो, माझे फोटो वापरायचे नाहीत, तर विषय संपला. तुमच्याकडे आहेत, ना तुमचे राष्ट्रीय नेते दिल्लीचे वगैरे त्यांचे फोटो वापरा. शरद पवार कशाला पाहिजेत? असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा – शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडे किती आमदार आहेत? वाचा संपूर्ण यादी
जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्यानंतर अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे की, शरद पवार जितेंद्र आव्हाडांची खासगी मालमत्ता नाही आहेत. शरद पवार सर्वांचे आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी अशी वक्तव्ये करू नयेत, अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी खडसावलं आहे.
शरद पवार नेमकं काय म्हणाले?
मी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आणि जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनीच आमचे फोटो वापरावे. ज्यांनी आमच्या विचारसरणीचा विश्वासघात केला, त्यांनी माझा फोटो वापरू नये. माझा फोटो कुणाला वापरू द्यायचा, हा माझ्या हयातीत तरी माझाच निर्णय आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.