Amit Shah | भारत ही काही धर्मशाळा नव्हे; अमित शहांचा घुसखोरांना इशारा

Amit Shah | लोकसभेत इमिग्रेशन अँड फॉरेनर्स बिल, २०२५ मंजूर करण्यात आले आहे. यानंतर लोकसभेत झालेल्या चर्चेत भाग घेताना देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. देशाच्या विकासात योगदान देणाऱ्या परदेशी लोकांचे स्वागतच केले जाईल. मात्र, सुरक्षेला धोका ठरणाऱ्यांना इथे राहू दिले जाणार नाही. भारत म्हणजे धर्मशाळा नव्हे, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, की राष्ट्रीय सुरक्षेला धोका ठरतील अशांना देशात प्रवेश दिला जाणार नाही. देश म्हणजे ‘धर्मशाळा’ नाही. जर कोणी देशाच्या विकासात योगदान देण्यासाठी देशात येत असेल तर त्यांचे नेहमीच स्वागत आहे. प्रस्तावित कायदा हा देशाच्या सुरक्षेला बळ देईल आणि यामुळे अर्थव्यवस्था आणि उद्योगांना बळ मिळेल. याबरोबरच आरोद्य आणि शिक्षण क्षेत्राला देखील प्रोत्साहन मिळेल. तसेच इमिग्रेशन विधेयकामुळे भारत देशात येणाऱ्या प्रत्येक विदेशी व्यक्तीची ताजी माहिती उपलब्ध होण्यास मदत होईल.
हेही वाचा : जिंदाल स्टेनलेस महाराष्ट्रात ४२ हजार ८८६ कोटींची गुंतवणूक करणार
वैयक्तिक फायद्यासाठी भारतात आश्रय घेणार्या अशा लोकांचे प्रमाण वाढले आहे, ज्यामुळे देश असुरक्षित झाला आहे. जर भारतात अशांतता निर्माण केली तर घुसखोरांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. या विधेयकामनुळे देशाची सुरक्षा बळकट होईल आणि यामुळे २०४७ पर्यंत भारत जगातील सर्वात विकसीत देश बनेल. मी देशाला खात्री देऊ इच्छितो की आपल्या देशात येणार्या प्रत्येक परदेशी व्यक्तीची अप-टू-डेट माहिती आपल्याकडे असेल, असेही अमित शाह म्हणाले.
भारताला पर्यटक म्हणून शिक्षणासाठी, आरोग्य सुविधांसाठी, आर अँड डी, व्यवसाय आणि अशाच काही कारणांसाठी भेट देऊ इच्छिणाऱ्यांचे मी स्वागत करतो. पण जे देशासाठी धोका ठरतील आम्ही त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवू आणि त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करू, असे अमित शाह म्हणाले.