अजितदादांनी फोनवरुन केली दिपक चव्हाण यांची उमेदवाराची घोषणा
फलटण विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवाराची घोषणा केल्याने सर्वच जण अचंबित
फलटण : महायुतीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अन् भाजपमध्ये जागा वाटपावर चर्चा सुरु आहे. विद्यामान आमदार असलेले मतदार संघ त्या, त्या पक्षाकडे जाण्याची शक्यता आहे. महायुतीमधील पक्षांत उमेदवार जाहीर करण्यात अजित पवार यांनी आघाडी घेतली आहे. अजित पवार यांनी साताऱ्यामधील फलटण विधानसभा मतदार संघातील उमदेवार जाहीर केला आहे.
फलटण विधानसभा मतदारसंघातील उत्तर कोरेगाव तालुक्यातील सोळशी ग्रामपंचायतीच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उपस्थित राहणार होते. परंतु त्यांना या कार्यक्रमास उपस्थित राहता आले नाही. मात्र त्यांनी सभेत फोनवरुन नागरिकांसोबत संवाद साधला. त्यावेळी आगामी फलटण विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवाराची घोषणा केली. अजित पवार यांनी विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली. त्यांच्या उमेदवारीची घोषणा होताच सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत तुतारीला मदत करणारे विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या भाषण सुरु होते. त्यावेळी अजित पवार यांनी फोनद्वारे दिपक चव्हाण यांची उमेदवार म्हणून घोषणा केल्याने सर्वच जण अचंबित झाले आहेत.





