अजितदादांचे कट्टर समर्थक संजोग वाघेरे उद्धव ठाकरेंच्या भेटीला, राजकीय चर्चांना उधाण
![Ajit Pawar's staunch supporter Sanjog Waghere meets Uddhav Thackeray](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Sanjog-Waghire-780x470.jpg)
पिंपरी : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक संजोग वाघेरे यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली आहे. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
संजोग वाघेरे म्हणाले, मी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तीव्र इच्छुक आहे. मागील निवडणूक देखील मी इच्छुक होतो. तशी तयारी देखील केली होती. आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे प्रवेश केला नाही. उमेदवारी संदर्भात ते त्यांच्या वरिष्ठ नेत्यांशी, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील आणि मला कळवतील. त्यानंतर मी पुढील भूमिका स्पष्ट करेन.
हेही वाचा – श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी महोत्सव २९ डिसेंबरपासून
संजोग वाघेरे पाटील पिंपरी चिंचवड शहरातील शांत, संयमी आणि लोकाभिमुख नेतृत्व.. सुरुवातीपासून अजित पवार यांचे खंदे समर्थक असे त्यांची ओळख. नगरसेवक, महापौर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अशी महत्त्वाची पदे त्यांनी भूषविले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते मावळ लोकसभा मतदारसंघातून तीव्र इच्छुक आहेत.
मात्र सध्याच्या परिस्थितीत तिथे महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग बारणे हे खासदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाला तेथून उमेदवारी मिळणे याची शक्यता कमीच दिसत आहे. म्हणूनच संजोग वाघेरे पाटील यांनी आज थेट मातोश्री गाठत आपले मनसुबे स्पष्ट केले आहेत. मावळ मधून ते तीव्र इच्छुक असून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी त्याबाबत थेट चर्चा केली आहे.