breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी महोत्सव २९ डिसेंबरपासून

पिंपरी : महान गणेभक्त श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांचा ४६२ वा संजीवन समाधी महोत्सव २९ डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान संपन्न होणार आहे. या निमित्ताने चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि चिंचवड ग्रामस्थांच्या वतीने धार्मिक कार्यक्रम व उपशास्त्रीय व सुगम संगीत, तसेच व्याख्यान, आरोग्य व रक्तदान शिबिरांसह विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

याबाबतची माहिती ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी आज (सोमवारी) पत्रकार परिषदेत दिली. महोत्सवाचे उद्‍‍घाटन, सन २०२४ च्या दिनदर्शिकेचे अनावरण आणि ‘भक्तीभाव देखोनिया चिंचवडी आला’ या पुस्तकाचे अनावरण तसेच चिंचवड देवस्थानच्या इंग्रजी भाषेतील वेबसाईटचे लोकार्पण श्री भगवान गढ संस्थानचे प्रमुख विश्वस्त न्यायाचार्य महंत डॉ. नामदेव शास्त्री महाराज यांच्या हस्ते २९ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता होणार आहे. याप्रसंगी महापालिका आयुक्त शेखर सिंह, धर्मदाय सहआयुक्त सुधीरकुमार बुक्के, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, तसेच खासदार श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार अश्विनी जगताप, महेश लांडगे, अण्णा बनसोडे, उमा खापरे, आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे मुख्य विश्वस्त योगेश देसाई, देहूतील संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, श्री मार्तंड मल्हारी संस्थान जेजुरीचे मुख्य विश्वस्त पोपटराव खोमणे तसेच चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त जितेंद्र देव, केशव विद्वांस, अॅड. राजेंद्र उमाप, अॅड. देवराज डहाळे आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

महोत्सवानिमित्त २९ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत रोज सकाळी ६ वाजता नितीन दैठणकर यांचे महासाधू श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी मंदिर येथे व श्री तुकाराम दैठणकर यांचे श्रीमंगलमूर्ती वाडा येथे सनई-चौघडा वादन होईल. सकाळी ८.३० वाजता श्री मोरया गोसावी चरित्र पठण, सकाळी ९ ते १२ या वेळेत चंद्रशेखर रबडे गुरुजी यांचा लक्ष्मी-विनायक याग होईल. सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत रक्तदान शिबिर, नेत्र व दंत चिकित्सा आणि आरोग्य शिबिर होईल. सायंकाळी ५ वाजता संजीवन समाधी महोत्सवाचे उद्घाटन होईल. सायंकाळी ७ वा. अपर्णा कुलकर्णी यांचे “क्रांतिवीर चापेकर बंधू” या विषयावर व्याख्यान होणार आहे. सायंकाळी ८ वा. स्त्रीजीवनाला समर्पित “फिरुनी नवी जन्मेन मी” हा गायनाचा कार्यक्रम होईल.

हेही वाचा  –  RCB आयपीएल का जिंकत नाही? एम.एस.धोनीनं सांगितलं कारण; म्हणाला..

३० डिसेंबर रोजी सकाळी ६ वा. सोहम् योग साधना वर्गाचे शिबीर, सकाळी ७ वा. सामुहिक अथर्वशीर्ष पठण सकाळी ९ ते १२ दरम्यान सामुहिक अभिषेक, नेत्र व दंत चिकित्सा शिबिर होईल. दुपारी १२ ते ४ या वेळेत स्थानिक मंडळाचा भजन सेवेचे कार्यक्रम, सायंकाळी ४.३० वा. लक्ष्मीप्रसाद शंकरराव कुलकर्णी यांचे कीर्तन होईल. सायंकाळी ६ वा. प्रिया जोग यांचे विष्णूसहस्त्रनाम या विषयावर व्याख्यान होणार आहे, सायंकाळी ७ वा. अनय जोगळेकर यांचे “अंतरराष्ट्रीय स्त्ररावर भारताने केलेली प्रगती” या विषयावर व्याख्यान होणार आहे. सायंकाळी ८.३० वा. पद्मश्री पं. उल्हास कशाळकर, तालयोगी पं.सुरेश तळवलकर यांचा उपशास्त्रीय व अभंगवाणीचा कार्यक्रम होणार आहे.

३१ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ४ दरम्यान आरोग्य व दंत चिकित्सा शिबिर होईल. दुपारी १२ ते ४ या वेळेत स्थानिक मंडळाचा भजन सेवेचे कार्यक्रम, सायंकाळी ४.३० वा. श्री लक्ष्मीप्रसाद शंकरराव कुलकर्णी यांचे कीर्तन होईल. सायंकाळी ६ वा. छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनानिमित्त श्री सुनील देवधर यांचे व्याख्यान होणार आहे. रात्री ८.३० वाजता ग.दि. माडगुळकर व सुधीर फडके यांची अजरामर कलाकृती, गीत रामायणचा कार्यक्रम श्रीधर फडके सादर करणार आहेत.

१ जानेवारी रोजी दुपारी ३ वा. श्री मोरया गोसावी महाराज जीवन चरीत्र दशावतारी नाट्याच्या माध्यमातून सादर करण्यात येणार आहे. सायंकाळी ६ ते ८ दरम्यान श्री मोरया गोसावी महाराज जीवन गौरव पुरस्कार विश्वविक्रमवीर अभिनेते प्रशांत दामले यांना अॅड. उज्वल निकम आणि चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळ यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. तर, रात्री ८.३० वाजता गायिका सावनी शेंडे-अमर ओक व सहकलाकार यांचा कार्यक्रम होईल.

२ जानेवारी रोजी पहाटे ४.३० वाजता महासाधू श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधीची महापूजा होईल. सकाळी ६ वाजता सनई चौघडा वादन, सकाळी ७ वाजता श्री मोरया गोसावी संजीवन समाधी मंदिरावर पुष्पवृष्टी होईल. सकाळी ८ वा. समर्थ भक्त श्री प्रसादबुवा रामदासी यांचे कीर्तन होईल त्यानंतर श्री मोरया गोसावी महाराज चरित्र पठण होईल. दुपारी १२ वाजता महाप्रसाद आणि सायंकाळी ६ वा. श्री मोरया गोसावी संजीवन समाधी मंदिरात भव्य आतिषबाजी व चिंचवड येथील स्वराज्य ढोलताशा पथकाची मानवंदना होईल. रात्री १० वाजता श्री मोरया गोसावी संजीवन समाधी समोर धुपारती व त्यानंतर श्री मंगलमुर्ती वाडा येथे धुपारती होईल. त्यानंतर महोत्सवाची सांगता होईल. या सर्व धार्मिक कार्यक्रमांना गणेश भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वस्त मंडळांने केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button